स्मिथचे काहीही चुकले नाही: क्रिकेट ऑस्ट्रेलिया

पीटीआय
बुधवार, 8 मार्च 2017

स्टिव्ह स्मिथ याच्या हेतुविषयी शंका घेणे सर्वथा चुकीचे आहे. स्मिथ हा उत्तम क्रिकेटपटू व चांगला मनुष्य आहे. त्याच्या कृतीमागे कोणताही गैरहेतु होता, असे आम्हाला वाटत नाही

मेलबोर्न - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याच्या हेतुविषयी शंका घेणे पूर्णत: चुकीचे असून स्मिथ याच्या "त्या' कृतीमागे कोणताही गैरहेतु नव्हता, अशी भूमिका "क्रिकेट ऑस्ट्रेलिया'कडून घेण्यात आली आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान पंचांनी पायचीत दिल्यानंतर डीआरएस घ्यावे अथवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत असलेला स्मिथ हा संघाच्या ड्रेसिंग रुमकडे सूचक संकेतांसाठी पाहत असल्याचे आढळून आले होते. डीआरएस व्यवस्थेच्या नियमावलीमध्ये हा पर्याय वापरताना ड्रेसिंग रुममधून कोणताही संकेत देण्यात येऊ नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
 स्मिथ याच्या या कृतीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

यानंतर, या प्रकरणानंतर वरमलेल्या स्मिथ याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. "माझ्याकडून असे कृत्य व्हावयास नको होते; मात्र थोडा गोंधळ उडाल्याने असे झाले,' असे घडल्या प्रकाराबद्दल माफी मागत स्मिथ याने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ याची पाठराखणच करण्यात आली आहे.

"स्टिव्ह स्मिथ याच्या हेतुविषयी शंका घेणे सर्वथा चुकीचे आहे. स्मिथ हा उत्तम क्रिकेटपटू व चांगला मनुष्य आहे. अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा तो आदर्श आहे. तेव्हा त्याच्या कृतीमागे कोणताही गैरहेतु होता, असे आम्हाला वाटत नाही,'' असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी म्हटले आहे. स्मिथ याच्या या कृतीमुळे खळबळ उडाली होती.

ज्येष्ठ भारतीय किकेटपटू सौरव गांगुली व सुनील गावसकर यांनी स्मिथवर टीका करत या प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Outrageous to question Smith’s integrity: CA