ऑस्ट्रेलियासमोर पुन्हा एकदा पाकिस्तानचे आव्हान

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

मेलबर्न- पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळविला असला, तरी उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान निश्‍चित असेल.

मेलबर्न- पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळविला असला, तरी उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान निश्‍चित असेल.

विजयासाठी 490 धावांचे आव्हान देऊनही ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत केवळ 39 धावांनी विजय मिळवता आला होता. ऑस्ट्रेलियाला सुद्धा रोखता येते, याचा आत्मविश्‍वास पाकिस्तानला मिळाला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत सुरवातीपासूनच नियोजनबद्ध खेळ करून ऑस्ट्रेलियावर दडपण ठेवण्याचे मनसुबे पाकिस्तानी संघ ठेवून असल्याचे आश्‍चर्य वाटणार नाही.

ऑस्ट्रेलियाने विजयी संघ कायम ठेवण्याचे स्पष्ट केले असले, तरी पाकिस्तानने सोहेल खान किंवा इम्रान खान यांना संधी मिळेल, असे संकेत दिले आहेत. त्यासाठी राहत अली याला वगळले जाऊ शकते.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील रंगत वाढवण्यासाठी पाकिस्तानला या सामन्यात विजय आवश्‍यक आहे. पाकिस्तानचा कर्णधार मिस्बा उल हक म्हणाला, ""पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झालो असलो, तरी ऑस्ट्रेलियाला रोखता येते, हा आत्मविश्‍वास आमच्या खेळाडूंमध्ये निर्माण झाला आहे. संघात एखाददुसरा बदल होऊ शकतो. सोहेल खानला संधी देण्याचा आमचा विचार आहे. तो नवा चेंडू अधिक चांगला हाताळू शकतो. मालिकेतील रंगत कायम राखायची असेल, तर आम्हाला विजय अपेक्षित आहे आणि त्यासाठी फलंदाज आणि गोलंदाज दोघांकडून चांगली कामगिरी व्हायला हवी.''

मेलबर्नची खेळपट्टी नेहमीच आशियाई संघांना आव्हानात्मक ठरत असते, असे सांगून मिस्बा म्हणाला, ""येथील वातावरणचे वेगळे आहे. गोलंदाजांना दिशा आणि टप्पा अचूक राखावा लागतो, तर फलंदाजांसाठी संयम महत्त्वाचा ठरत असतो. या दोन्ही गोष्टी जुळून आल्या तर आम्ही ऑस्ट्रेलियावर दडपण ठेवू शकतो.''
दुसरीकडे विजयानंतरही टीकेचे धनी व्हावे लागलेला ऑस्ट्रेलिया संघ टीकाकारांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. अपयशी फलंदाज मॅडिन्सन याला संघात कायम ठेवण्याचे सूतोवाच कर्णधार स्मिथ याने केले.

तो म्हणाला, "मॅडिन्सनकडे आम्ही फलंदाज म्हणून बघत नाही. तो अष्टपैलू खेळाडू आहे. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांवर पडणारा भार कमी करण्यासाठी आम्ही अष्टपैलू खेळाडूची निवड केली आहे. त्याची गोलंदाजी हेझलवूड, स्टार्क आणि बर्ड यांना पूरक ठरावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यानंतर त्याने धावा केल्या, तर आम्हाला त्या हव्याच आहेत.''

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पहिल्या कसोटीत चांगली झाली असली, तरी त्यांना सातत्य दाखवावे लागणार आहे. त्याहीपेक्षा त्यांच्या गोलंदाजांना लय गवसणे सर्वांत आवश्‍यक आहे. पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात त्यांच्या गोलंदाजांना निर्णायक घाव घालता आला नव्हता. त्यामुळे आता उद्यापासून सुरू होणाऱ्या बॉक्‍सिंग डे कसोटीत गोलंदाजांची भूमिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरेल. दोघांनी आपल्या संघाची बांधणी तशाच पद्धतीने केली आहे.

Web Title: pakistan poses challenge to australia