पाकिस्तानवर बहिष्कार अशक्‍यच; "आयसीसी'ने दिले संकेत 

वृत्तसंस्था
Tuesday, 26 February 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याचा मुद्दाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत चर्चेस येणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय मंडळास स्पष्ट केल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्याचवेळी स्पर्धेच्या सुरक्षेबाबतच्या भारतीय मंडळाच्या शंका दूर करण्यात येतील, असे समजते. 

नवी दिल्ली- विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याचा मुद्दाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत चर्चेस येणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय मंडळास स्पष्ट केल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्याचवेळी स्पर्धेच्या सुरक्षेबाबतच्या भारतीय मंडळाच्या शंका दूर करण्यात येतील, असे समजते. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांनी दहशतवादास खतपाणी घालणाऱ्या देशांबरोबर क्रिकेट खेळू नये, अशी विनंती आयसीसीला केली आहे. जोहरी यांच्या या पत्रावर आयसीसी बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. मात्र या पत्रात कुठेही पाकिस्तान असा थेट उल्लेख नाही. 

भारताने स्पर्धेदरम्यानच्या सुरक्षेबाबत शंका घेतली आहे. "विश्‍वकरंडक स्पर्धेच्यावेळी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची आयसीसी या बैठकीत माहिती देणार आहे. ती फक्त भारतासाठी नसून सर्वच सहभागी देशांसाठी आहे. इंग्लंडने स्पर्धेचे कायम चांगले आयोजन केले आहे. आता केवळ आक्षेप घेतल्यामुळे शंका दूर करण्यात येतील,' असे भारतीय मंडळातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

पाकिस्तानवरील बहिष्काराचा मुद्दाही चर्चेस येण्याची शक्‍यताच नाही. एखाद्या संघाबरोबरचे संबंध तोडण्यास आयसीसी कसे सांगणार. त्यांना ते सांगण्याचा हक्कही नाही. हा राजनैतिक प्रश्‍न आहे. त्याबाबत सरकारी स्तरावरच निर्णय होऊ शकेल. सदस्य देश एखाद्या मुद्द्याबाबत चर्चा करू शकतात, पण त्यातून काहीही घडणार नाही, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan's boycott is impossible ICC indicated