पंतला आता वन डे पदार्पणाची संधी 

वृत्तसंस्था
Sunday, 21 October 2018

आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार आहे.
 

गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार आहे.

भारताने उद्याच्या या सामन्यासाठी अंतिम 12 खेळाडूंची निवड केली, त्यात पंतला स्थान दिले. त्यामुळे तो एकदिवसीय पदार्पण करण्याच्या मार्गावर आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीवरच असेल. त्यामुळे पंत केवळ फलंदाज म्हणून संघात असेल. असे आत्ताचे तरी चित्र आहे.

आशिया करंडक स्पर्धेतील विश्रांतीनंतर विराट कोहली संघात परतला आहे. गेल्या काही सामन्यांत दिनेश कार्तिकही फलंदाज म्हणून खेळत होता; परंतु त्याला वगळून पंतला संधी देण्यात आली. एकूणच मधल्या फळीसाठी आणि धोनीचा वारसदार म्हणूनही पंतकडे पाहिले जात आहे. इंग्लंडविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत फलंदाज म्हणून त्याने केलेल्या कामगिरीवर विराट आणि शास्त्री दोघेही समाधानी आहेत. 

धोनीवर दडपण 
पंत संघात आल्यामुळे धोनीवर फलंदाज म्हणून मोठे योगदान देण्याचे दडपण असेल. आशिया स्पर्धेत धोनीला 19.25 च्या सरासरीने केवळ 77 धावाच करता आल्या आणि त्याचा स्ट्राईक रेटही 62.09 एवढाच होता. 2018 या वर्षात 15 सामन्यांमध्ये धोनीला 10 वेळा फलंदाजीची संधी मिळाली आणि त्यामध्ये त्याची सरासरी 28.12 आणि स्ट्राईक रेट 67.36 असा आहे. त्यामुळे आता पंत आणि धोनीच्या कामगिरीची आकडेवारीतही तुलना केली जाऊ शकेल. 

कमकुवत विंडीज 
विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ व्यवस्थापन संघ रचनेचा विचार करून काही प्रयोग करत असेल आणि प्रामुख्याने प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती देत असले, तरी भारताचे पारडे चांगलेच जड आहे. अगोदर ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि काही दिवसांपूर्वी एरविन लुईस या धडाकेबाज फलंदाजांनी माघार घेतल्यामुळे विंडीजची फलंदाजी कमकुवत झाली आहे. एकदिवसीय क्रमवारीत विंडीज सध्या नवव्या स्थानी आहे. भारतात येण्यापूर्वी त्यांनी बांगलादेशविरुद्धची मालिका गमावली होती. 2014 नंतर ते एकही मालिका जिंकलेले नाहीत. 

एकदिवसीय सामन्यांतील आमची कामगिरी पाहिली, तर चौथ्या क्रमांकाचा केवळ प्रश्‍न शिल्लक आहे. माझ्यासह शिखर आणि रोहित चांगल्या धावा करत असल्यामुळे मधल्या फळीला तशी संधी मिळालेली नाही; परंतु मधल्या फळीत अनुभवी खेळाडू असल्यामुळे आमची फलंदाजी समतोल आहे. - विराट कोहली, भारतीय कर्णधार 

सामन्याची वेळ- दुपारी 1.30 पासून 
थेट प्रक्षेपण- स्टार स्पोर्टस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pant has now a chance to make his ODI debut