राष्ट्रगीतावेळी च्युईंगगम खाल्ल्याने परवेझ रसूलवर टीका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना काश्मिरी ऑफ-स्पिनर परवेझ रसूल हा च्युईंग गम चघळताना दिसला.

नवी दिल्ली- तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर पुन्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाल्यावर टीम इंडियातील सहकाऱ्यांसोबत धमाल करू अशी आशा परवेझ रसूल याला असेल. मात्र, राष्ट्रगीताकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून त्याला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले. 

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान प्रजासत्ताकदिनी (गुरुवारी) कानपूर येथे पहिला टी-20 क्रिकेट सामना झाला. सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना काश्मिरी ऑफ-स्पिनर परवेझ रसूल हा च्युईंग गम चघळताना दिसला. आणि सोशल मीडियावर लोक त्याच्यावर तुटून पडले. 'ट्विटराटीं'नी रसूलवर सडकून टीका केली. यासंबंधीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

हा राष्ट्रगीताचा अनादर आहे. रसूलने च्युईंग गम खाणे बंद करायला पाहिजे होते, असे मत लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त करायला सुरवात केली. 
'भारताचे राष्ट्रगीत ऐकविले जात नसेल म्हणून च्युईंगगम खाऊ तो या त्रासातून सुटका मिळवत असेल,' अशी प्रतिक्रिया जॅक स्पॅरो नावाच्या एका हँडलवरून ट्विट करण्यात आली आहे. 

तसेच, परवेझ राष्ट्रगीत चालू असताना निवांत उभा राहून च्युईंग गम चघळताना पाहून नाराज झालो. तो भारताची जर्सी घालू शकतो, तर राष्ट्रगीत म्हणू शकत नाही का, असे चिन्मय जावळेकर याने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

परवेझ रसूलला राष्ट्रगीतापेक्षा च्युईंग गम जास्त महत्त्वाची वाटते असं दिसत आहे, अशी टीका लोलेंद्र सिंगने केली आहे.
 

Web Title: Parvez Rasool attracts controversy by chewing gum during National Anthem

व्हिडीओ गॅलरी