कोहली-पुजारा-आश्‍विनमुळे भारताचे वर्चस्व 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

या डावात विराट कोहलीने कसोटीतील 14 वे शतक झळकाविले. विशेष म्हणजे, गेल्या सात शतकांपैकी सहा वेळा कोहलीने 140 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. गेल्या सात शतकांमध्ये कोहलीने 141, 169, 147, 103, 200, 211 आणि 167 अशा धावा केल्या. कसोटीतील त्याच्या पहिल्या सात शतकांमध्ये कोहली 120पेक्षा जास्त धावा करू शकला नव्हता. 

विशाखापट्टणम : विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा यांची दमदार शतके, आर. आश्‍विनचा अष्टपैलू खेळ आणि पदार्पण करणाऱ्या जयंत यादवने दिलेले धक्के यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी भारताने सामन्यावर पकड मिळविली आहे. भारताचा पहिला डाव 455 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात निम्मा संघ गमावून 103 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंड अजूनही 352 धावांनी पिछाडीवर आहे. फॉलो-ऑन टाळण्यासाठीही इंग्लंडला उद्या झगडावे लागणार आहे. 

कोहली-पुजारानंतर आश्‍विननेही इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्याच्यासह जयंत यादवने केलेल्या भागीदारीमुळे भारताने 455 धावांपर्यंत मजल मारली. खेळपट्टीचे स्वरूप पाहता, 455 ही धावसंख्या इंग्लंडसाठी मोठे आव्हान ठरण्याची दाट शक्‍यता आहे. 

या भारत दौऱ्यामध्ये इंग्लंडसमोर आश्‍विन आणि कोहली यांचेच मुख्य आव्हान असेल, अशी अटकळ बांधली जात होती. गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही ठसा उमटवत आश्‍विनने इंग्लंडसमोर खरोखरच आव्हान उभे केले. काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने चार गडी गमावून 317 धावा केल्या होत्या आणि कर्णधार कोहली 151, तर आश्‍विन एक धाव करून खेळत होते. कोहली या धावसंख्येत आज फार भर घालू शकला नाही. मोईन अलीने टाकलेले भारताच्या डावातील 101 वे षटक नाट्यमय ठरले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्लिपमध्ये बेन स्टोक्‍सने आश्‍विनचा झेल सोडला. या वेळी आश्‍विन-कोहलीने एक धाव घेतली. त्याच्या पुढच्याच चेंडूवर कोहलीने स्लिपमध्येच स्टोक्‍सकडे झेल दिला. त्यानंतर 105 व्या षटकात मोईन अलीने वृद्धिमान साहा आणि रवींद्र जडेजाला बाद केले. यामुळे भारताची स्थिती 4 बाद 351 वरून 7 बाद 363 अशी झाली. 

अष्टपैलू म्हणून नावारूपाला येत असलेल्या आश्‍विनने एक बाजू लावून धरली होती. कसोटीत पदार्पण करणाऱ्या जयंत यादवने त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच दमविले. यादवने पदार्पणातच 35 धावा केल्या. अर्धशतक झळकावलेल्या आश्‍विन बाद झाल्याने ही जोडी फुटली. त्यानंतर 28 धावांची भर घालून भारतीय संघाचा डाव संपुष्टात आला. 

इंग्लंडच्या डावाची सुरवात मात्र खराब झाली. महंमद शमीने डावाच्या तिसऱ्याच षटकात एका अप्रतिम चेंडूवर कर्णधार ऍलिस्टर कूकचा त्रिफळा उडविला. कूकच्या ऑफस्टंपचे अक्षरश: दोन तुकडे झाले. नवोदित सलामीवीर हसीब हमीद आणि ज्यो रूटने अत्यंत संथ फलंदाजी करत इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी 20 व्या षटकामध्ये संघाचे अर्धशतक झळकाविले. दोन धावा घेण्यासाठी धावलेला हसीब हमीद जयंत यादवच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या 'धोनी-स्टाईल' थ्रोमुळे धावबाद झाला. 

चाचपडत खेळणाऱ्या बेन डकेटची धडपड आश्‍विनच्या एका अप्रतिम चेंडूने संपुष्टात आणली. धोकादायक मोईन अलीही 21 चेंडू खेळून केवळ एक धाव करून बाद झाला. दुसरीकडे, ज्यो रूटने संथ अर्धशतक झळकाविले. आश्‍विननेच त्याचा अडथळा दूर केला. त्यानंतर बेन स्टोक्‍स आणि जॉनी बेअरस्टॉ यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. 

धावफलक : 
भारत : पहिला डाव : 129.4 षटकांत सर्वबाद 455 

मुरली विजय 20, लोकेश राहुल 0, चेतेश्‍वर पुजारा 119, विराट कोहली 167, अजिंक्‍य रहाणे 23, आर. आश्‍विन 58, वृद्धिमान साहा 3, रवींद्र जडेजा 0, जयंत यादव 35, उमेश यादव 13, महंमद शमी नाबाद 7 
अवांतर : 10 
गोलंदाजी : 
जेम्स अँडरसन 3-62, स्टुअर्ट ब्रॉड 1-49, बेन स्टोक्‍स 1-73, झफर अन्सारी 0-45, आदिल रशीद 2-110, मोईन अली 3-98, ज्यो रूट 0-9 
इंग्लंड : पहिला डाव : 49 षटकांत 5 बाद 103 
ऍलिस्टर कूक 2, हसीब हमीद 13, ज्यो रूट 53, बेन डकेट 5, मोईन अली 1, बेन स्टोक्‍स खेळत आहे 12, जॉनी बेअरस्टॉ खेळत आहे 12 
अवांतर :
गोलंदाजी : 
महंमद शमी 1-15, उमेश यादव 0-14, रवींद्र जडेजा 0-38, आर. आश्‍विन 2-20, जयंत यादव 1-11

Web Title: R Ashwin scores half century; India puts 455 against England