आश्‍विनच्या 37 कसोटींमध्येच 200 विकेट्‌स

वृत्तसंस्था
रविवार, 25 सप्टेंबर 2016

आर. आश्‍विनची कामगिरी : 

  • कसोटी : 37 सामन्यांत 200* बळी 
  • वन-डे : 102 सामन्यांत 142 बळी 
  • ट्‌वेंटी-20 : 45 सामन्यांत 52 बळी 

कानपूर : अफलातून सूर गवसलेला ऑफस्पिनर रविचंद्रन आश्‍विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज (रविवार) वकार युनूस आणि डेनिस लिली या महान गोलंदाजांचा विक्रम मोडला. सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्‍विनने वकार आणि लिली यांना मागे टाकले. या यादीत आश्‍विन आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

न्यूझीलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी आश्‍विनचे कसोटीमध्ये 193 बळी होते. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आश्‍विनला एकही विकेट मिळाली नाही. पण तिसऱ्या दिवशी आश्‍विनने चार फलंदाजांना बाद केले. त्यानंतर आज न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातही आश्‍विनने आतापर्यंत तीन बळी मिळविले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला बाद करत आश्‍विनने कसोटीतील 200 बळींचा टप्पा गाठला. ही आश्‍विनची 37 वी कसोटी आहे. वकार युनूस आणि डेनिस लिली या दोघांनीही 38 कसोटींमध्ये 200 बळी मिळविण्याची कामगिरी केली होती. सर्वांत कमी कसोटींमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर क्‍लॅरी ग्रिमेट अव्वल स्थानी आहेत. त्यांनी 36 कसोटींमध्ये ही कामगिरी केली होती. 

    Web Title: R Ashwin takes 200 wickets in 37 tests