आश्‍विन-कोहलीमुळे भारताचे वर्चस्व 

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

धावफलक : 
भारत : पहिला डाव : सर्वबाद 455 
इंग्लंड : पहिला डाव : सर्वबाद 255 

बेन स्टोक्‍स 70, जॉनी बेअरस्टॉ 53, ज्यो रूट 53, आदिल रशीद नाबाद 32 
आश्‍विन 5-67, रवींद्र जडेजा 1-57, उमेश यादव 1-56, महंमद शमी 1-28, जयंत यादव 1-38 
भारत : दुसरा डाव : 34 षटकांत 3 बाद 98 
मुरली विजय 3, लोकेश राहुल 10, चेतेश्‍वर पुजारा 1, विराट कोहली खेळत आहे 56, अजिंक्‍य रहाणे खेळत आहे 22 
अवांतर :
स्टुअर्ट ब्रॉड 2-6, जेम्स अँडरसन 1-16 

विशाखापट्टणम : रविचंद्रन आश्‍विनला काही वेळा गोलंदाजीमध्ये सूर सापडायला थोडा वेळ लागतो. पण एकदा सूर गवसला, की त्याच्यासमोर कुठलाही फलंदाज तग धरू शकत नाही, हे आज (शनिवार) पुन्हा एकदा सिद्ध झाले.

त्यातच, या वर्षी अफलातून सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीचीही त्याला साथ लाभली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यावरील पकड घट्ट केली. पहिल्या डावात 200 धावांची आघाडी घेणाऱ्या भारताने दिवसअखेर तीन गडी गमावून 98 धावा केल्या. यामुळे भारताकडे एकूण 298 धावांची आघाडी आहे. खेळ थांबला, तेव्हा कोहली 56, तर अजिंक्‍य रहाणे 22 धावांवर खेळत होते. 

दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आश्‍विनने पाच विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. भेदक, वेगवान आणि अचूक गोलंदाजी करत उमेश यादवनेही इंग्लिश फलंदाजांना त्रस्त केले. बेन स्टोक्‍स आणि जॉनी बेअरस्टॉ यांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, तरीही आश्‍विनच्या फिरकीसमोर त्यांचा पहिला डाव 255 धावांतच गुंडाळला गेला. यामुळे भारताला पहिल्या डावात 200 धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली. पण गोलंदाजांना विश्रांती मिळावी म्हणून कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला 'फॉलो-ऑन' न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

दुसऱ्या डावात भारताची सुरवात खराब झाली. मुरली विजय आणि लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर पहिल्या 10 षटकांतच बाद झाले. त्यानंतर चेतेश्‍वर पुजाराही एक धाव काढून तंबूत परतला. यानंतर मात्र कोहली-रहाणे जोडीने इंग्लंडला यश मिळू दिले नाही. 

स्टोक्‍स आणि बेअरस्टॉने काल (शुक्रवार) शेवटच्या सत्रातील भेदक गोलंदाजी संयमाने खेळून काढली. त्यानंतर आज सकाळच्या सत्रात त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारले. खेळपट्टीवरून फिरकी गोलंदाजांना हवी तेवढी साथ मिळत नव्हती. अशा वेळी जिवापाड प्रयत्न करणाऱ्या उमेश यादवच्या हाती कोहलीने चेंडू सोपविला. अप्रतिम 'रिव्हर्स स्विंग'वर त्याने स्थिरावलेल्या बेअरस्टॉचा त्रिफळा उडविला. उपाहारापूर्वी मिळालेल्या या यशामुळे भारतीय संघाचा आत्मविश्‍वास उंचावला होता. पण बेन स्टोक्‍स खेळपट्टीवर नांगर टाकून उभा होता. अखेर आश्‍विनने स्टोक्‍सचा अडथळा दूर केला. त्यानंतर जडेजा-आश्‍विनने इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद केले. इंग्लंडचे शेवटचे चार फलंदाज 12.2 षटकांत बाद झाले. 

कसोटी क्रिकेटमध्ये आश्‍विनने एका डावात पाच बळी घेण्याची ही 22 वी वेळ आहे. आश्‍विनने माल्कम मार्शल, वकार युनूस, कर्टली ऍम्ब्रोज आणि कोर्टनी वॉल्श यांच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरने सर्वाधिक 67 वेळा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे. त्यानंतर शेन वॉर्न (37), रिचर्ड हॅडली (36), अनिल कुंबळे (35), ग्लेन मॅकग्रा (29), रंगना हेराथ (28), इयान बोथम (27), डेल स्टेन (26), वासिम अक्रम (25), हरभजनसिंग (25), सिडनी बर्न्स (24), डेनिस लिली (23), इम्रान खान (23), कपिलदेव (23) हे आश्‍विनच्या पुढे आहेत. यापैकी रंगना हेराथ, डेल स्टेन आणि हरभजनसिंग वगळता सर्व जण निवृत्त झाले आहेत. 

Web Title: R Ashwin takes five again; Englad all out for 255; India get lead of 200