विराट-कुंबळेमुळे 'बेंच स्ट्रेंथ' भक्कम : द्रविड 

वृत्तसंस्था
रविवार, 25 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: एकेकाळी भारतीय क्रिकेटमधील कमकुवत दुवा असलेली 'बेंच स्ट्रेंथ' अलीकडच्या काळात संघाचे बलस्थान बनले आहे. याचा शिल्पकार असलेले माजी कर्णधार आणि 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र याचे श्रेय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे या जोडीला दिले आहे. 

नवी दिल्ली: एकेकाळी भारतीय क्रिकेटमधील कमकुवत दुवा असलेली 'बेंच स्ट्रेंथ' अलीकडच्या काळात संघाचे बलस्थान बनले आहे. याचा शिल्पकार असलेले माजी कर्णधार आणि 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र याचे श्रेय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे या जोडीला दिले आहे. 

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची संधी असतानाही द्रविड यांनी जाणीवपूर्वक 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास प्राधान्य दिले. भारतीय संघाची पुढील फळी घडविण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. जयंत यादव, करुण नायर यांच्यासारख्या खेळाडूंनी अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्कम कामगिरी केली आहे. यासंदर्भात द्रविड यांनी 'बीसीसीआय'च्या अधिकृत संकेतस्थळाला मुलाखत दिली. 

या मुलाखतीत द्रविड म्हणाले, "देशाच्या 'अ' संघातून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत असल्याचे पाहून समाधान वाटते. गेल्या काही वर्षांत विचारपूर्वक तयार केलेल्या कार्यपद्धतीतूनच हे साध्य झाले आहे. विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांचे यात मोलाचे योगदान आहे. त्यांच्यामुळे संघात दाखल झालेल्या नवोदित खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळते आणि त्यातून यश कसे मिळते, हे आपण पाहत आहोतच! खेळाडू घडविण्याच्या या प्रक्रियेचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो.'' 

जयंत यादवने त्याच्या सुरवातीच्या काही कसोटींमध्येच उत्तम गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाज म्हणून कामगिरी केली आहे. करुण नायरने त्याच्या तिसऱ्याच कसोटीमध्ये त्रिशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. या दोघांचेही द्रविड यांनी तोंडभरून कौतुक केले. 'कसोटीमध्ये पहिलेच शतक करताना थेट त्रिशतक झळकाविणे ही भन्नाटच कामगिरी आहे. यातून करुण नायरची कामगिरी आणि त्याचे कौशल्य दिसून येते. जयंत आणि करुणसारखे तरुण खेळाडू पुढे येत जबाबदारी स्वीकारत आहेत, हे भारतीय क्रिकेटसाठी सुचिन्हच आहे,' असे द्रविड म्हणाले. 

माझे काम खेळाडू घडविण्याचे! 
19 वर्षांखालील संघ आणि 'अ' संघाचे प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी खेळाडू घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी द्रविड यांच्यावर आहे. यासंदर्भात ते म्हणाले, "आम्ही सतत भारतीय संघव्यवस्थापनाच्या संपर्कात असतो. भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचे खेळाडू संघासाठी आवश्‍यक आहेत, यासंदर्भात चर्चाही होत असते. भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडू हवे असतील, तर आम्ही ज्युनिअर क्रिकेटमध्ये अधिकाधिक अष्टपैलूंना संधी देत त्यांच्यातील कौशल्य शोधण्याचा प्रयत्न करतो. 19 वर्षांखालील संघ आणि 'अ' संघ यांचे मुख्य लक्ष्य 'सामन्याचा निकाल' हे कधीच नसते. या पातळीवर सामन्याचा निकाल एका मर्यादेपर्यंतच महत्त्वाचा असतो. त्यापेक्षा महत्त्वाचे असते ते खेळाडू घडविणे! केवळ क्रीडांगणावरच नव्हे, तर माणूस म्हणून घडविणे सर्वाधिक महत्त्वाचे असते, जेणेकरून आयुष्याच्या पुढील टप्प्यावर त्यांना या अनुभवाचा फायदा होऊ शकेल.'' 

Web Title: Rahul Dravid credits Virat Kohli, Anil Kumble for success of youngsters