युनूसच्या शतकानंतरही ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व

रॉयटर्स
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पाकिस्तानवर फॉलोऑनची टांगती तलवार
सिडनी - मधल्या फळीतला अनुभवी फलंदाज युनूस खानने नाबाद शतकी खेळी केली असली, तरी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम राहिले आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस पाकिस्तानची अवस्था 8 बाद 271 अशी झाली असून, त्यांना फॉलोऑन वाचवण्यासाठी अजून 68 धावांची गरज आहे. ते 271 धावांनी पिछाडीवर आहेत.

पाकिस्तानवर फॉलोऑनची टांगती तलवार
सिडनी - मधल्या फळीतला अनुभवी फलंदाज युनूस खानने नाबाद शतकी खेळी केली असली, तरी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम राहिले आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस पाकिस्तानची अवस्था 8 बाद 271 अशी झाली असून, त्यांना फॉलोऑन वाचवण्यासाठी अजून 68 धावांची गरज आहे. ते 271 धावांनी पिछाडीवर आहेत.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययाने खेळाला उशिराने सुरवात झाली. त्यानंतर युनूस खाने वयाच्या 39व्या वर्षी झळकावलेले कारकिर्दीमधील 34वे शतक पाकिस्तानसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले; पण त्यांना ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर देण्यात अपयश आले. चहापानानंतर 12वा चौकार लगावून युनूसने आपले ऑस्ट्रेलियातील पहिले शतक साजरे केले. सामन्याच्या उर्वरित दोन दिवसांत हवामानाने मर्जी राखल्यास ऑस्ट्रेलियाला विजयाची चांगली संधी आहे. खेळ थांबला तेव्हा युनूस खान 136, तर यासिर शाह 5 धावांवर खेळत होता.

त्यापूर्वी, युनूस आणि अझर या कालच्या नाबाद जोडीने आत्मविश्‍वासाने पाकिस्तानचा डाव पुढे चालू ठेवला. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज त्यांच्यासमोर निष्प्रभ ठरत होते. अशा वेळी चोरटी धाव घेण्याच्या नादात अझर धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला हवे असलेले यश मिळाले. अझर-युनूस यांनी तिसऱ्या विकेटसाठी 146 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यावर पाकिस्तानचे अन्य फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. पण, युनूस दुसऱ्या बाजूने उभा राहिल्याने पाकिस्तानच्या डावाने तग धरला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी आज नॅथन लियोनसमोर नांगी टाकली. त्याने तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 8 बाद 538 घोषित, पाकिस्तान पहिला डाव 95 षटकांत 8 बाद 271 (युनूस खान खेळत आहे 136, अझर अली 71, जोश हेझलवूड 2-53, नॅथन लियोन 3-98)

Web Title: ranaji karandak austrolia & pakistan