गोहेलची प्रथम श्रेणीत विश्‍वविक्रमी खेळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

रणजी लढतीत ओडिशाविरुद्ध फटकावल्या नाबाद ३५९ धावा

जयपूर - कर्नाटकाच्या करुण नायरची त्रिशतकी खेळी अजून विसरली जात नाही, तो गुजरातचा सलामीचा फलंदाज समित गोहेल याने मंगळवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रणजी उपांत्यपूर्व लढतीत ओडिशाविरुद्ध सलामीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहताना ३५९ धावांची खेळी करताना ११७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. सलामीला फलंदाजीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहताना गोहेल इतक्‍या धावा कुणी केलेल्या नाहीत. 

रणजी लढतीत ओडिशाविरुद्ध फटकावल्या नाबाद ३५९ धावा

जयपूर - कर्नाटकाच्या करुण नायरची त्रिशतकी खेळी अजून विसरली जात नाही, तो गुजरातचा सलामीचा फलंदाज समित गोहेल याने मंगळवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रणजी उपांत्यपूर्व लढतीत ओडिशाविरुद्ध सलामीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहताना ३५९ धावांची खेळी करताना ११७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. सलामीला फलंदाजीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहताना गोहेल इतक्‍या धावा कुणी केलेल्या नाहीत. 

गुजरातच्या ६४१ धावांत गोहेलचा वाटा ३५९ धावांचा होता. यापूर्वीचा ३५७ धावांचा विक्रम सरेच्या बॉबी एबल याने कौंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेटविरुद्ध १८९९ मध्ये नोंदवला होता. यानंतरही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या हनिफ महंमद यांनी सलामीचा फलंदाज म्हणून केलेल्या ४९९ धावांच्या सर्वोच्च खेळीचा विक्रम अबाधित राहिला. 

गोहेलने ७२३ चेंडूंमधील मॅरेथॉन खेळीत ४५ चौकार आणि अवघा एकच षटकार ठोकला. पहिल्या डावाच्या आघाडीवर गुजरातची आगेकूच निश्‍चित असल्यामुळे या सामन्यातील स्वारस्य निघून गेले होते. पण, तरी गोहेलची ही प्रदीर्घ खेळी विसरता येणार नाही.

विक्रमी खेळीबद्दल बोलताना गोहेल म्हणाला, ‘‘माझ्याकडून विश्‍वविक्रमी खेळी झाली याची मला कल्पना नव्हती. जेवढी प्रदीर्घ खेळी करता येईल, तेवढी करायची इतकेच ठरवले होते. प्रशिक्षक विजय पटेल आणि कर्णधार पार्थिव पटेल यांनी मोठी खेळी कर, इतकेच सांगितले होते. मी केवळ त्यांचे ऐकले. मी प्रदीर्घ काळ फलंदाजी करू शकतो हे मला समजले. कारकिर्दीमधील हा सर्वोत्तम दिवस असेल. अजूनही मला या खेळीबद्दल बोलण्यासाठी शब्दच सुचत नाहीत.’’

गोहेलचे वडील भानूभाई पटेल यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून, आता मला खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाईल याचा आनंद असल्याचे समितने सांगितले. तो म्हणाला, ‘‘माझे वडील काही मोठे व्यावसायिक नाहीत. आज माझ्या कामगिरीची बातमी त्यांना देण्यासाठी मी फोन करू शकत नाही. मला अजूनही शासकीय नोकरीची अपेक्षा आहे. त्यासाठी क्रीडा कोट्यातून मी अर्जदेखील केला आहे. पण, अजूनही त्याला उत्तर आलेले नाही.’’

यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा प्रियांक पांचाळ याच्यापासूनच मला खरी प्रेरणा मिळाली, असे सांगून समित म्हणाला, ‘‘या मोसमात प्रियांकची आणि इंग्लंडविरुद्ध पार्थिवने केलेली कामगिरी माझ्यासाठी प्रेरित करणारी ठरली. प्रशिक्षक देवांग देसाई आणि हिरेन पटेल यांनी प्रत्येक वेळी क्रिकेटमध्ये खेळताना मानसिकता सर्वांत महत्त्वाची असल्याचे शिकवले. त्यानुसारच मी फलंदाजी केली. अशीही नेटमध्ये असो वा सामन्यात मला प्रदीर्घ फलंदाजी करायला नेहमीच आवडते.’’
 

समित हा तसा बचावात्मक प्रवृत्तीचा फलंदाज आहे. आता तो त्याच्या खेळामध्ये विविधता आणू लागला आहे. त्याची ७२३ चेंडूंतील खेळीच त्याच्या एकाग्रतेविषयी खूप काही सांगून जाते.
- विजय पटेल, गुजरातचे प्रशिक्षक

रणजी स्पर्धेतील विक्रमी दिवस
रणजी स्पर्धेच्या इतिहासातील चौथी सर्वोच्च खेळी. यापूर्वी महाराष्ट्राचे भाऊसाहेब निंबाळकर (नाबाद ४४३ वि.  काठेवाड १९४८-४९), मुंबईचा संजय मांजरेकर (३७७ वि. हैदराबाद १९९०-९१) आणि हैदराबादचा एम. व्ही. श्रीधर (३६६ वि. आंध्र प्रदेश १९९३-९४) यांनी रणजी स्पर्धेत साडेतीनशेहून अधिक धावा केल्या.

समित गोहेलने नाबाद ३५९ धावांची खेळी करताना विजय मर्चंट यांनी १९४३-४४ मध्ये महाराष्ट्रविरुद्ध केलेल्या खेळीशी बरोबरी केली. 

रणजी स्पर्धेत व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (३५३), चेतेश्‍वर पुजारा (३५३) आणि स्वप्नील गुगळे (नाबाद ३५१) यांच्याही साडेतीनशेहून अधिक धावा.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहताना समितची सर्वोच्च खेळी. यापूर्वी सॉमरसेट्या बॉबी एबलचा (नाबाद ३५७) विक्रम समितने मोडला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन नाबाद राहताना त्रिशतकी खेळी करणारे डब्ल्यू. जी. ग्रेस नाबाद ३१८ (१९७६), बिल ॲशडाऊन नाबाद ३०५ (१९३५) हे अन्य दोनच फलंदाज. 

रणजी स्पर्धेत दुसऱ्या डावात त्रिशतकी खेळी करणारा तिसरा फलंदाज. यापूर्वी विजय हजारे (३०९) आणि चेतेश्‍वर पुजारा (३५२). हजारे यांच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संघाला फॉलोऑन मिळाल्यावर ही खेळी केली.

सर्वाधिक चेंडू खेळणारा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सहावा आणि रणजी स्पर्धेतील तिसरा फलंदाज. यापूर्वी रणजी स्पर्धेत पंजाबच्या भूपिंदर सिंगने ७३८ चेंडूंत २३९, तर हिमाचल प्रदेशच्या राजीव नायरने ७२८ चेंडूत २७२ धावांची खेळी केली होती.

समित आपल्या नाबाद त्रिशतकी खेळीत तब्बल ९६४ मिनिटे खेळपट्टीवर होता. खेळपट्टीवर खऱ्या अर्थाने मॅरेथॉन खेळी करणारा राजीव नायर हा एकमेव फलंदाज १९९९-२००० मध्ये जम्मू काश्‍मीरविरुद्ध राजीव नायर १०१५ मिनिटे खेळपट्टीवर.

गुजरातची (६४१) रणजी स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या. महाराष्ट्राविरुद्ध त्यांनी १९९५-९६च्या मोसमात ६४० धावा केल्या होत्या.

यंदाच्या मोसमातील गुजरातच्या दुसऱ्यांदा सहाशेहून अधिक धावा. पंजाबविरुद्ध ६ बाद ६२४ धावा. प्रियांक पांचाळच्या नाबाद ३१४ धावा.

आतापर्यंत रणजी स्पर्धेत गुजरातकडून एकही त्रिशतकी खेळी नाही. यंदाच्या मोसमात दोन.

Web Title: ranaji karandak competition