मुंबईला 251 धावांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

तमिळनाडूकडून अभिनव मुकुंद, बाबा इंद्रजितचे शतक

तमिळनाडूकडून अभिनव मुकुंद, बाबा इंद्रजितचे शतक
राजकोट - पहिल्या डावात शतकी आघाडी घेतलेल्या मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तमिळनाडूचा धावांचा धडाका रोखण्यात अपयश आले. मुंबईसमोर आता निर्णायक विजयासाठी 251 धावांचे आव्हान आहे. सामन्याचा उद्या अखेरचा दिवस असून, आता सामना अनिर्णित राखायचा, की विजयासाठी प्रयत्न करायचे हे सर्वस्वी मुंबईच्या खेळाडूंच्याच हातात आहे.

चौथ्या दिवशी वेगाने धावा करीत पाचव्या दिवशी मुंबईचा डाव गुंडाळण्याचे प्रयत्न करणेच तमिळनाडूच्या हाती होते. गंगा श्रीधर राजू आणि अभिनव मुकुंदने 64 धावांच्या सलामीसाठी 21 षटके घेतली. मुकुंद आणि बाबा इंद्रजित या शतकवीरांनी 185 धावांची भागीदारी 43.2 षटकांत केली. त्यानंतर 14 षटकांत 107 धावांची आतषबाजी करीत तमिळनाडूने सहज साडेतीनशेचा टप्पा पार केला.

पहिल्या डावातही मुंबईस सतावलेल्या इंद्रजितने धावांची गती वाढवली होती. त्याच्या आक्रमकतेने सहकाऱ्यांचा आत्मविश्‍वास उंचावला. मात्र, मुंबईला खराब क्षेत्ररक्षणाचा जास्त फटका बसला. आदित्य तरेने मुकुंदला यष्टिचीत करण्याची संधी 41 व्या षटकात सोडली, तर त्याच षटकात विजय गोहिल स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेऊ शकला नाही. इंद्रजितला सिद्धेश लाडने जीवदान दिले होते. तमिळनाडूला 78 षटकांत साडेतीनशेपेक्षा जास्त धावा करण्यात याच चुका पथ्यावर पडल्या. दिनेश कार्तिक, तसेच बढती दिलेला विजय शंकरने धावगतीस जबरदस्त वेग दिला होता.

दिवसअखेरीस मुंबईने आव्हानाचा पाठलाग करताना पाच षटकांत बिनबाद 5 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ आणि प्रफुल वाघेला ही मुंबईची सलामीची जोडी मैदानात आहे.

तमिळनाडूला पाच धावांचा दंड
तमिळनाडूचे फलंदाज धावा घेताना खेळपट्टीवरून धावत असल्यामुळे मुंबई संघाने हस्तक्षेप केला. त्यातच रिव्हर्स स्वीपनंतर विजय शंकर यष्टीसमोरून धावल्यामुळे पंच वीरेंद्र शर्मा यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी तमिळनाडूला पाच धावांचा दंडही केला. त्यामुळे मुंबईची धावसंख्या 406 वरून 411 झाली आणि मुंबईसमोरील लक्ष्य 256 ऐवजी 251 झाले. त्यानंतरही प्रतिस्पर्धी संघातील शाब्दिक चकमकी सुरूच होत्या.

संक्षिप्त धावफलक- तमिळनाडू, पहिला डाव - 305 आणि दुसरा डाव - 6 बाद 356 (व्ही गंगाश्रीधर राजू 28, अभिनव मुकुंद 122, बाबा इंद्रजित 138, दिनेश कार्तिक 24 , व्ही. शंकर 24 , बलविंदर संधू 2-67, विजय गोहिल 2-110) वि. मुंबई, पहिला डाव - 411 (पाच धावांच्या दंडासह) आणि दुसरा डाव - 5 षटकांत बिनबाद 5.

Web Title: ranaji karandak competition mumbai & tamilnadu