विजय गोहिलमुळे मुंबईला विजयाची संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

विजयासाठी 232 धावांच्या आव्हानासमोर हैदराबाद अडचणीत
रायपूर - डावखुरा फिरकी गोलंदाज विजय गोहिल याच्या प्रभावी माऱ्यामुळे हैदराबादविरुद्धच्या रणजी उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हैदराबादला 232 धावांचे आव्हान दिल्यानंतर मुंबईने चौथ्या दिवसाच्या अखेरीस त्यांची 7 बाद 121 अशी अवस्था केली. यातील पाच बळी गोहिलने मिळवले आहेत.

विजयासाठी 232 धावांच्या आव्हानासमोर हैदराबाद अडचणीत
रायपूर - डावखुरा फिरकी गोलंदाज विजय गोहिल याच्या प्रभावी माऱ्यामुळे हैदराबादविरुद्धच्या रणजी उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हैदराबादला 232 धावांचे आव्हान दिल्यानंतर मुंबईने चौथ्या दिवसाच्या अखेरीस त्यांची 7 बाद 121 अशी अवस्था केली. यातील पाच बळी गोहिलने मिळवले आहेत.

तब्बल 41वेळा रणजी विजेतेपद मिळवणारा मुंबईचा संघ अडचणीत आल्यावर नेहमीच उसळी घेतो, असा इतिहास आहे. या सामन्यातही त्यांनी अशीच उसळी घेत सामन्यावर पकड मिळवली. हैदराबादने 232 धावांचे लक्ष्य गाठण्यास सुरवात केल्यानंतर खेळपट्टीपेक्षा मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची मानसिक कोंडी करण्यावर भर दिला. हैदराबादच्या फलंदाजांसमोर अनेक प्रश्‍न निर्माण करून, त्यांना चुका करण्यास त्यांनी भाग पाडले.

सामन्याचा चौथा दिवस हैदराबादच्या दुसऱ्या डावाला नाट्यमय कलाटणी देणारा ठरला. मुंबईचा नवोदित गोलंदाज विजय गोहिलने केवळ अचूक टप्प्यावर भर दिला आणि हैदराबादचे फलंदाज त्याला विकेट बहाल करत राहिले. दुसऱ्या दिवशी बोटाला दुखापत झाल्यामुळे विजयला विश्रांती घेणे भाग पडले. परंतु, आज परतल्यानंतर अखेरच्या सत्रातील दोन स्पेलमध्ये त्याने सामना मुंबईच्या बाजूने झुकवला.

मुंबईचा डाव संपुष्टात आणल्यानंतर मैदानात उतरणाऱ्या हैदराबादचा सलामीवीर तन्मय अगरवालने शार्दुल ठाकूरच्या उसळत्या चेंडूंवर हल्ला चढवत दोन षटकार मारले. त्या वेळी हैदराबादने 1 बाद 41 अशी मजल मारली होती. थोड्याच वेळात विजय गोहिल गोलंदाजीस आला आणि त्याने आठव्याच चेंडूवर अगरवालला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकात विजयने कर्णधार बद्रीनाथला बाद केले. पुढे सरसावत फटका मारण्याचा मोह बद्रीनाथला नडला.

मैदानावर दोन डावखुरे फलंदाज असल्यामुळे मुंबईचा कर्णधार तरे याने 5-1-19-2 अशा कामगिरीनंतरही विजयची गोलंदाजी थांबवली. त्या वेळी अभिषेक नायरने बी. संदीपचा बचाव भेदला आणि हैदराबाची 4 बाद 88 अशी अवस्था केली. त्यानंतर तरेने पुन्हा विजयला गोलंदाजीस आणले आणि त्याने पाठोपाठ तीन विकेट मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक
मुंबई, पहिला डाव - 294 आणि दुसरा डाव ः 217 (आदित्य तरे 57, सिद्धेश लाड 46, सी. व्ही. मिलिंद 2-25, महम्मद सिराज 5-52, भंडारी 2-55). हैदराबाद, पहिला डाव ः 280 आणि दुसरा डाव ः 7 बाद 121 (तन्मय अगरवाल 29, बी. अनिरुद्ध 40, बी. संदीप 25; अभिषेक नायर 2-27, विजय गोहिल 5-28).

Web Title: ranaji karandak cricket competition