नायरने केला मुंबईच्या विजयावर अभिषेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

उपांत्य फेरीच्या लढतीत आता तमिळनाडूशी सामना

रायपूर - हैदराबादच्या तळाच्या तीन फलंदाजांचा प्रतिकार अखेर मोडून गतविजेत्या मुंबईने यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. मुंबईच्या ‘खडूस’ खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिषेक नायरने या तीनही विकेट मिळवल्या. कमी अधिक प्रमाणात बॅकफूटवर राहावे लागणाऱ्या मुंबईने मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावून ३० धावांनी विजय मिळविला. उपांत्य लढतीत आता मुंबईचा सामना तमिळनाडूशी होणार आहे.

उपांत्य फेरीच्या लढतीत आता तमिळनाडूशी सामना

रायपूर - हैदराबादच्या तळाच्या तीन फलंदाजांचा प्रतिकार अखेर मोडून गतविजेत्या मुंबईने यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. मुंबईच्या ‘खडूस’ खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिषेक नायरने या तीनही विकेट मिळवल्या. कमी अधिक प्रमाणात बॅकफूटवर राहावे लागणाऱ्या मुंबईने मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावून ३० धावांनी विजय मिळविला. उपांत्य लढतीत आता मुंबईचा सामना तमिळनाडूशी होणार आहे.

विजयासाठी असलेल्या २३२ धावांच्या आव्हानासमोर काल चौथ्या दिवसअखेर हैदराबादची ७ बाद १२१ अशी अवस्था झाली होती, तेव्हा आजअखेरच्या दिवशी मुंबईच्या विजयाची केवळ औपचारिकता असल्याचे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच घडले नाही. या अखेरच्या तीन विकेटसाठी मुंबईला शर्थ करावी लागली. या तिन्ही विकेट मिळवणाऱ्या नायरने पाच बळींची कामगिरी केली. त्याने संपूर्ण सामन्यात ९ बळी आणि फलंदाजीत ६७ धावा अशी कामगिरी केली.

आज खेळ सुरू झाल्यावर खेळपट्टी फलंदाजीस साथ देत होती. चेंडूही जुना झालेला असल्यामुळे स्विंग होत नव्हता. शार्दूल ठाकूर आणि नायरदेखील हैदराबादच्या फलंदाजांसमोर प्रश्‍नचिन्ह उभे करू शकत नव्हते. त्यामुळे मुंबई कर्णधार तरेने शार्दूलऐवजी विजय गोहिल आणि नायरऐवजी अक्षय गिरप असे बदल केले. दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाज असल्यामुळे धावा करणे सोपे होत गेले. डावखुऱ्या मिलिंदने गोहिलला दोन चौकार मारले; तर दुसऱ्या बाजूने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अनिरुद्धने गिरप, गोहिल आणि त्यानंतर गोलंदाजीस आलेल्या देशपांडेवर हल्ला चढवला. त्यामुळे तरेने गोहिलऐवजी बदली गोलंदाज केविन अल्मेडा हा पर्यायही तपासून पाहिला.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच तरेने पुन्हा नायरकडे आशेने पाहिले आणि दुसऱ्या हप्त्यात त्याने एका सुरेख आउटस्विंगरवर मिलिंदला यष्टिरक्षक तरेकडेच झेल देण्यास भाग पाडले. दोन चेंडूंनंतर त्याने महंमद सिराजला पायचीत टिपले. ७ बाद १२१ अशा सुरवातीनंतर ७ बाद १८५ वरून ९ बाद १८५ अशी अवस्था केल्यामुळे मुंबईचा उत्साह वाढला. दोन्ही संघांमध्ये ४७ धावांचे अंतर होते. ८४ धावांची खेळी करणाऱ्या अनिरुद्धने तळाच्या रवी किरणच्या साथीत दोनशे धावांचा टप्पा पार केला, पण लगेचच नायरने रवी किरणला बाद करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सर्व खेळाडूंनी सुटकेचा निःश्‍वास टाकला त्या वेळी नायरचा जल्लोष खडूस मुंबईकरासारखा होता.

संक्षिप्त धावफलक
मुंबई, पहिला डाव - २९४ आणि दुसरा डाव २१७.
हैदराबाद, पहिला डाव - २८० आणि दुसरा डाव - २०१ (तन्मय अगरवाल २९, बी. अनिरुद्ध ८४-१८७ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, बी. संदीप २५, सी. व्ही. मिलिंद २९, अभिषेक नायर ५-४०, विजय गोहिल ५-६४)

Web Title: ranaji karandak cricket competition