गुजरात 65 वर्षांनंतर अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

बुमराच्या भेदकतेसमोर झारखंडचा डाव कोलमडला
नागपूर - भारतीय संघाकडून झटपट क्रिकेट खेळणारा जसप्रीत बुमरा आणि आयात केलेला आर. पी. सिंग या दोघांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने बुधवारी रणजी उपांत्य लढतीत चौथ्या दिवशीच झारखंडचा 123 धावांनी पराभव केला. गुजरातने तब्बल 65 वर्षांनी रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

बुमराच्या भेदकतेसमोर झारखंडचा डाव कोलमडला
नागपूर - भारतीय संघाकडून झटपट क्रिकेट खेळणारा जसप्रीत बुमरा आणि आयात केलेला आर. पी. सिंग या दोघांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने बुधवारी रणजी उपांत्य लढतीत चौथ्या दिवशीच झारखंडचा 123 धावांनी पराभव केला. गुजरातने तब्बल 65 वर्षांनी रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या चौथ्या दिवशी गुजरातने झारखंडला निर्णायक विजयासाठी 235 धावांचे आव्हान दिले होते. चौथ्या दिवसाचा उर्वरित वेळ आणि संपूर्ण पाचवा दिवस इतका वेळ आणि फलंदाजांची क्षमता लक्षात घेता, हे आव्हान झारखंड संघाच्या आवाक्‍यातील होते. मात्र आर.पी. आणि बुमराच्या भेदकतेसमोर त्यांचा दुसरा डाव अवघ्या 111 धावांतच संपुष्टात आला.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झारखंडची सुरवातच अपयशाने झाली. आर.पी.ने प्रथम प्रत्युष सिंगचा त्रिफळा उडवला. समोरच्या बाजूने बुमराने सुमित कुमारला बाद केले. सलामीची जोडी झटपट तंबूत परतल्यावर झारखंडवर दडपण आले. या दडपणातून ते अखेरपर्यंत बाहेर येऊ शकले नाहीत. आर.पी.ने झारखंडच्या पडझडीस सुरवात केल्यावर बुमराने आपल्या अचूक गोलंदाजीने त्यांच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. त्याने 29 धावांत सहा गडी बाद केले. पहिल्या डावात सहा गडी टिपणाऱ्या आर.पी.ने दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाच्या 4 बाद 100 या धावसंख्येवरून दुसऱ्या डावाला सुरवात करणाऱ्या गुजरातचा दुसरा डाव 252 धावांत आटोपला. मनप्रीत जुनेजा (81 धावा, 125 चेंडू, 12 चौकार) आणि चिराग गांधी (51 धावा, 104 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार) यांनी अर्धशतकी खेळी करून झारखंडसमोर आव्हानात्मक विजयी लक्ष्य ठेवण्यात मदत केली. जुनेजा व चिरागने सातव्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली.

झारखंडकडून फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने पाच गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
गुजरात पहिला डाव : 390. झारखंड पहिला डाव : 408.
गुजरात दुसरा डाव : 81 षटकांत सर्वबाद 252 (मनप्रीत जुनेजा 81, चिराग गांधी 51, समित गोहिल 49, भार्गव मेराई 44, शाहबाज नदीम 5-69, विकास सिंग 2-44, राहुल शुक्‍ला 1-501).

झारखंड दुसरा डाव : 41 षटकांत सर्वबाद 111 (कौशल सिंग 24, ईशान किशन 19, विकास सिंग 18, सौरभ तिवारी 17, विराट सिंग 17, जसप्रीत बुमरा 6-29, आर. पी. सिंग 3-25, हार्दिक पटेल 1-46).

गुजरातच्या अंतिम फेरीचा योगायोग
गुजरातने यापूर्वी 1950-51 मध्ये रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर तब्बल 65 वर्षांनी त्यांनी अंतिम फेरीचा दरवाजा उघडला. अंतिम लढतीचा योगायोग म्हणजे 65 वर्षापूर्वीची अंतिम लढत इंदूर येथे झाली होती आणि या मोसमाची अंतिम लढतही इंदूर येथेच होणार आहे. फक्त त्या वेळी गुजरातला होळकर संघाकडून 189 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.

65 वर्षांनंतर रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा खूप आनंद झाला. आमच्यासाठी हा केवळ विजय नसून, ऐतिहासिक क्षण आहे. प्रत्येकाने विजयात मोलाचे योगदान दिले. विशेषत: बुमरा व "आरपी' यांचे योगदान निर्णायक ठरले. लाल माती व थोडे गवत असलेल्या या खेळपट्‌टीवर चौथ्या डावात 235 धावा काढणे निश्‍चितच सोपी गोष्ट नव्हती. खेळपट्‌टी पाहूनच आम्ही नाणेफेकीनंतर फलंदाजीचा निर्णय घेतला होता. विजयाचे सारे श्रेय सांघिक कामगिरीलाच जाते.
-पार्थिव पटेल, गुजरातचा कर्णधार

Web Title: ranaji karandak gujrat & jharkhand