2011 ची वर्ल्डकप फायनलचा निकाल संशयास्पद: रणतुंगा 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

मुंबईतील त्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 274 अशी मजल मारली होती. त्यांनी सचिन तेंडुलकरला झटपट बाद करून वर्चस्वही मिळवले होते, पण त्यानंतर खराब गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणामुळे पकड गमावली.

कोलंबो : भारताने 2011 च्या विश्‍वकरंडक क्रिकेट अंतिम लढतीत श्रीलंकेस पराजित करून जागतिक विजेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. आता श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा यांनी या लढतीच्या निकालाबाबत शंका घेतली आहे. त्यांनी या लढतीबाबत मॅच फिक्‍सिंगचा आक्षेप घेतला आहे. 

रणतुंगा यांनी या लढतीच्या निकालाबाबत शंका घेणारा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. वानखेडे स्टेडियमवरील श्रीलंकेचा पराभव पाहून आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले आहे. "वर्ल्ड कपच्या वेळी मी समालोचनासाठी भारतातच होतो. आमच्या पराभवानंतर खूपच निराश झालो. त्याचवेळी मला शंका आली होती. त्या लढतीतील श्रीलंकेच्या कामगिरीची चौकशी होण्याची गरज आहे. आत्ताच मी काही जाहीर करणार नाही, पण भविष्यात नक्कीच करणार आहे. या सामन्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे,' असे रणतुंगा यांनी सांगितले आहे. खेळाडू आपल्या पांढऱ्या पोषाखाखाली चिखल झाकू शकणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 

मुंबईतील त्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 274 अशी मजल मारली होती. त्यांनी सचिन तेंडुलकरला झटपट बाद करून वर्चस्वही मिळवले होते, पण त्यानंतर खराब गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणामुळे पकड गमावली. श्रीलंका संघाने सामना भारतास बहाल केला असल्याचा आक्षेप तेथील काही माध्यमांनी घेतला होता, पण आत्तापर्यंत कोणीही याबाबतच्या चौकशीची मागणी केली नव्हती. 

दरम्यान, रणतुंगा श्रीलंकेतील क्रिकेटबद्दल अध्यक्षांची भेट घेणार आहेत. एजंटच्या मुद्द्यावरून खेळाडू आणि श्रीलंका क्रीडा मंत्रालयात संघर्ष सुरू आहे. एजंटबाबत नियमावली तयार करण्याचा विचार असल्याचे श्रीलंका क्रीडामंत्री दयासिरी जयसेखरा यांनी सांगितले आहे. एका खेळाडूच्या मदतीने निकाल निश्‍चिती करता येणार नाही, हाच आपला उद्देश असल्याचे जयसेखरा यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranatunga seeks probe into 2011 World Cup final defeat to India