रांचीची खेळपट्टी अपेक्षेपेक्षा वेगळी राहिली - धोनी

सुनंदन लेले 
बुधवार, 22 मार्च 2017

रांची - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या कर्मभूमीत होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यास केवळ अखेरच्या दिवशी उपस्थित राहू शकला. सामन्याच्या अखेरच्या टप्प्याचा आनंद घेतल्यानंतर धोनीने प्रशिक्षक कुंबळे यांच्याशी औपचारिक गप्पा मारताना ‘रांचीची खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे खेळली नाही.’ हे मान्य केले. 

रांची - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या कर्मभूमीत होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यास केवळ अखेरच्या दिवशी उपस्थित राहू शकला. सामन्याच्या अखेरच्या टप्प्याचा आनंद घेतल्यानंतर धोनीने प्रशिक्षक कुंबळे यांच्याशी औपचारिक गप्पा मारताना ‘रांचीची खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे खेळली नाही.’ हे मान्य केले. 

रांचीतील मैदानाच्या जडणघडणीत जसा अमिताभ चौधरी यांचा वाटा आहे, तसाच प्रत्यक्ष मैदान आणि त्यातही तेथील खेळपट्ट्या घडवण्यात धोनीचा सिंहाचा वाटा आहे. त्याने खेळपट्ट्यांच्या विकासासाठी अनेकदा जातीने लक्ष दिले आहे. मैदानावरील कोणती खेळपट्टी कशी खेळते, तिचा स्थायी स्वभाव कायम आहे, याचा अचूक अंदाज त्याला आहे. तिसऱ्या कसोटीत खेळपट्टीचा नेमका अंदाज पाचही दिवस कुणालाच आला नाही. धोनीने यावर ‘पाणी आणि रोलिंग जास्त झाले’, असे एका वाक्‍यात उत्तर दिले. 

कुऱ्हाड आश्‍विनच्या गोलंदाजीवर
खेळपट्टीच्या स्थायी स्वभावाविषयी धोनी म्हणाला, ‘‘नॅथन लायनच्या माऱ्यातील धार बोथट व्हावी म्हणून खेळपट्टी जरा चांगली केली. त्यातही दोन्ही संघांत वेगवान डावखुरा गोलंदाज नसल्याने उजव्या यष्टिबाहेरची माती पाच दिवस मोकळीच झाली नाही. ऑफ स्पिनरसाठी खेळपट्टीला काहीच मदत झाली नाही. यामुळे लायनच्या गोलंदाजीचा काटा निघाला; पण त्याचा परिणाम उलटादेखील झाला. कुऱ्हाड आश्‍विच्या गोलंदाजीवर पडली. संघात चार गोलंदाज असताना आश्‍विनला लय गवसली नाही, तर भारतीय संघ मायदेशात जिंकणे कठीण आहे. रांचीत हेच झाले.’’
धोनीने प्रशिक्षकाशी बोलताना पुजारा आणि साहा यांच्या खेळीचे कौतुक केले. ‘‘पुजारा सकाळी नाश्‍त्याला दूध आणि कॉर्नफ्लेक्‍सच्या बरोबरीने फेव्हिकॉलही खात असावा’, असे धोनी गमतीने बोलला; पण त्याने दोघांना शाबासकी दिली. तो म्हणाला, ‘‘प्रदीर्घ खेळी करायचे पुजाराचे तंत्र आणि इच्छाशक्ती जबरदस्त आहे. वृद्धिमान साहा यानेदेखील कमालीचा संयम दाखवला. शांत स्वभाव हे त्याचे वैशिष्ट्य आहे; पण त्यामुळे हा जिगरबाज खेळाडू मागे राहातो.’’

सतत क्रिकेट खेळल्याने भारतीय क्रिकेटपटू थकल्याचे परिणाम मोसमाच्या अखेरच्या टप्प्यात दिसू लागले आहेत, असेही धोनी जाताजाता बोलून गेला.

Web Title: Ranchi pitch