मुंबईची पकड निसटली?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

इंदूर - बेचाळिसाव्यांदा रणजी करंडक उंचावण्याचे मुंबईचे स्वप्न अपुरे राहण्याचेच संकेत मिळू लागले आहे. नकारात्मक मारा व वेळकाढू धोरण अवलंबणाऱ्या गुजरातला पहिल्यांदा रणजी करंडक जिंकण्याची संधी मिळाली आहे. ३१२ धावांच्या आव्हानासमोर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरवात केली असून, उद्या अखेरच्या दिवशी निर्णायक विजयासाठी त्यांना अजून २६५ धावांची गरज आहे. 

इंदूर - बेचाळिसाव्यांदा रणजी करंडक उंचावण्याचे मुंबईचे स्वप्न अपुरे राहण्याचेच संकेत मिळू लागले आहे. नकारात्मक मारा व वेळकाढू धोरण अवलंबणाऱ्या गुजरातला पहिल्यांदा रणजी करंडक जिंकण्याची संधी मिळाली आहे. ३१२ धावांच्या आव्हानासमोर गुजरातने बिनबाद ४७ अशी सुरवात केली असून, उद्या अखेरच्या दिवशी निर्णायक विजयासाठी त्यांना अजून २६५ धावांची गरज आहे. 

यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील चौथा दिवस विजेतेपदाचा कल स्पष्ट करणारा ठरला. गुजरातच्या सर्व प्रतिकाराचा सामना करत मुंबईने ४११ धावा केल्या खऱ्या; परंतु पहिल्या डावातील १०० धावांची पिछाडी त्यांच्या मुळावर आली आहे. गुजरातचे सलामीवीर समित गोहेल व प्रियांक पांचाळ या मोसमातील सर्वाधिक यशस्वी जोडीने १३.२ षटकांत चारपेक्षा अधिक धावांच्या सरासरीने नाबाद ४७ धावा केल्या. यावरून उद्या त्यांना उर्वरित २६५ धावा करणे जड जाणार नाही याचे संकेत मिळाले. सामना अनिर्णित राहिला तरी पहिल्या डावाच्या आघाडीवर ते विजेते ठरू शकतील. त्यामुळे मुंबईलाच अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

गुजरातने तिसऱ्या दिवशीअखेरच्या सत्रात षटकांची सरासरी न राखल्यामुळे आज ९० ऐवजी १०० षटकांचा खेळ अपेक्षित होता. पण, येथे अंधार लवकर पडत असल्यामुळे त्यांनी सकाळपासून नकारात्मक मारा केला. त्यातच चहापानानंतर जेव्हा मुंबईकडून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या वेळी त्यांनी वेळकाढू धोरण अवलंबिले. त्यामुळे आज ८३ षटकांचाच खेळ झाला. 

मुंबईकडून आज कर्णधार आदित्य तरे ६९ व अभिषेक नायर ९१ यांनी शानदार फलंदाजी केली; परंतु नायरचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी खराब फटके मारून विकेट गमावल्या. कालच्या ३ बाद २०८ धावांवरून आज खेळ पुढे सुरू करणाऱ्या मुंबईला वेगात धावा करण्याची गरज होती; परंतु १०० षटकांचा हिशेब ठेवून त्यांनी सावध सुरवात केली. त्यासाठी सूर्यकुमार यादव सकाळी लवकर बाद झाल्याचाही परिणाम झाला. 

गुजरातच्या गोलंदाजांना जाणीवपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा ठेवला. त्यातच दोन उसळते चेंडू टाकण्याची मुभा असल्यामुळे त्याचाही त्यांनी वापर केला. पहिल्या सत्रात यादवसह सिद्धेश लाड बाद झाला. उपाहारानंतर कर्णधार तरेचा बचाव फिरकी गोलंदाज हार्दिक पटेलने भेदला. अभिषेक नायर एक बाजू संयमाने लढवत होता; पण संधू व शार्दूल ठाकूर यांनी बेजबाबदार फटके मारून विकेट गमावल्या आणि मुंबईसमोर अधिक अडचणी निर्माण केल्या. ८ बाद ३२६ अशी अवस्था झाल्यावर नायरने विशाल दाभोळकरच्या साथीत ४४ धावांची भागीदारी केली. दाभोळकर बाद झाल्यावर मात्र त्याने गिअर बदलले आणि चौकार, षटकारांची टोलेबाजी सुरू केली. त्यामुळे मुंबईला ४११ धावांपर्यंत मजल मारता आली. अखेर शतकपासून नऊ धावा दूर असताना तो बाद झाला. अखेरच्या विकेटसाठी केलेल्या ३९ धावांच्या भागीत गोहिलचा वाटा एकाही धावेचा नव्हता; मात्र त्याने ३१ मिनिटे फलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई, पहिला डाव ः २२८ व दुसरा डाव ४११ (पृथ्वी शॉ ४४, श्रेयस अय्यर ८२, सूर्यकुमार यादव ४९, आदित्य तरे ६९- ११४ चेंडू, १२ चौकार, अभिषेक नायर ९१- १४६ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार; चिंतन गजा ३९-१०-१२१-६). गुजरात, पहिला डाव ः ३२८ व दुसरा डाव बिनबाद ४७.

Web Title: Ranji Trophy mumbai vs gujtar