जडेजाचे प्रतिआक्रमण; भारताला 32 धावांची आघाडी

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : सर्वबाद 300 
भारत : पहिला डाव : 9 बाद 331 

के. एल. राहुल 60, मुरली विजय 11, चेतेश्‍वर पुजारा 57, अजिंक्‍य रहाणे 46, करुण नायर 5, आर. आश्‍विन 30, वृद्धिमान साहा 31, रवींद्र जडेजा 63, भुवनेश्‍वर कुमार 0, कुलदीप यादव 7, उमेश यादव नाबाद 2 
अवांतर : 20 
गोलंदाजी : 
जोश हेझलवूड 1-51, पॅट कमिन्स 3-94, नॅथन लायन 5-92, स्टीव्ह ओकीफ 1-75, ग्लेन मॅक्‍सवेल 0-5.

धरमशाला : यंदाच्या मोसमात भन्नाट सूर गवसलेल्या रवींद्र जडेजामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला पहिल्या डावात आघाडी घेता आली. मात्र, जडेजा बाद झाल्यानंतर 13 चेंडूंत तीन गडी गमावल्याने मोठी आघाडी घेण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला. भारताचा पहिला डाव 332 धावांवर संपुष्टात आला. भारताकडे पहिल्या डावात 32 धावांची आघाडी आहे. 

काल नाबाद राहिलेला जडेजा आज (सोमवार) सकाळपासून आक्रमक भूमिकेत शिरला. दिवसाच्या पहिल्याच पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पंचांनी जडेजाला बाद ठरविले. पण जडेजाने 'डीआरएस'द्वारे या निर्णयाविरोधात दाद मागितली. मात्र, त्याची बॅट पॅडला आपटली होती आणि चेंडूला स्पर्शही झाला नव्हता. त्यामुळे त्याला नाबाद ठरविण्यात आले. त्यानंतर जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केले. त्याने 95 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 63 धावा केल्या. जडेजा आणि वृद्धिमान साहाने सातव्या विकेटसाठी 96 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात आघाडी घेतली. 

भारताकडे 17 धावांची आघाडी असताना पॅट कमिन्सने जडेजाचा त्रिफळा उडविला. त्यानंतरच्या 13 चेंडूंत भारताने भुवनेश्‍वर कुमार आणि वृद्धिमान साहालाही गमाविले. यंदाच्या मोसमातील जडेजाचे हे कसोटीतील सहावे अर्धशतक होते. विशेष म्हणजे, याच मोसमात जडेजाने 68 विकेट्‌सही घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या कसोटी क्रमवारीत जडेजा गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. 

साहा बाद झाल्यानंतर उमेश यादव आणि कुलदीप यादव यांनी भारताच्या धावसंख्येत 14 धावांची भर घातली. नॅथन लायनच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादव बाद झाला. 

धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : सर्वबाद 300 
भारत : पहिला डाव : 9 बाद 331 

के. एल. राहुल 60, मुरली विजय 11, चेतेश्‍वर पुजारा 57, अजिंक्‍य रहाणे 46, करुण नायर 5, आर. आश्‍विन 30, वृद्धिमान साहा 31, रवींद्र जडेजा 63, भुवनेश्‍वर कुमार 0, कुलदीप यादव 7, उमेश यादव नाबाद 2 
अवांतर : 20 
गोलंदाजी : 
जोश हेझलवूड 1-51, पॅट कमिन्स 3-94, नॅथन लायन 5-92, स्टीव्ह ओकीफ 1-75, ग्लेन मॅक्‍सवेल 0-5.

Web Title: Ravindra Jadeja helps India to take lead against Australia at Dharamshala