अखेरच्या ट्वेंटी20 सामन्यात भारतीयांचा विक्रमांचा पाऊस

वृत्तसंस्था
Monday, 9 July 2018

सलामीवीर रोहित शर्माचे नाबाद शतक आणि बढती दिलेल्या हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीने इंग्लंड संघाच्या मालिका जिंकण्याच्या आशा संपवल्या. ब्रिस्टल येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी विक्रमांचा जणू पाऊसच पाडला. 

ब्रिस्टल : प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानावर चौकार षटकारांसह भारतीय फलंदाजाने 199 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करत अखेरचा सामना जिंकून मालिका खिशात घातली. 

सलामीवीर रोहित शर्माचे नाबाद शतक आणि बढती दिलेल्या हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीने इंग्लंड संघाच्या मालिका जिंकण्याच्या आशा संपवल्या. ब्रिस्टल येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी विक्रमांचा जणू पाऊसच पाडला. 

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये तिसरे शतक झळकावले तर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये धोनीने यष्टीरक्षक म्हणून 54 फलंदाजांना बाद केले.  
एका सामन्यापेक्षा आधिक सामने असलेल्या मालिकेत भारतीय संघ 2016पासून अपराजित आहे. ऑगस्ट 2016मध्ये भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. 

तीन सामन्यांच्या ट्वेंटी20 मालिकेत भारतीय संघ आजवर एकदाही पराभूत झालेला नाही.  इंग्लंडविरुद्धची ट्वेंटी20 मालिका जिंकत भारताने आठवा मालिका विजय मिळाला. 

रोहित शर्माने रविवारी (8 जुलै) इंग्लंडविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय, तर जगातील पाचवा फलंदाज आहे. याआधी कर्णधार विराट कोहलीने नुकताच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला.  

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमधील तिसरे शतक झळकावत ट्वेंटी20 मध्ये भारतीय संघातील सर्वाधिक शतके करणारा खेळाडू तर क्रिकेटविश्वातील दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी न्युझीलंडचा फलंदाज कॉलिन मुनरोने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये तीन शतके केली आहेत. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमधील पहिले शतक 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. तर दुसरे शतक 2017मध्ये श्रीलंकाविरुद्ध केले होते. 

रविवारी (8 जुलै) इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सर्वोत्तम यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीनेही दोन विक्रम केले. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात धोनीने पाच झेल घेतले. ट्वेंटी20 मध्ये यष्टीमागे पाच झेल घेणारा धोनी एकमेव खेळाडू ठरला आहे. 

या सामन्यात धोनीने झेलांचे अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा धोनी एकमेव यष्टीरक्षक आहे. सर्व प्रकारच्या ट्वेंटी20 क्रिकटमध्ये यष्टीमागे 150 झेल घेणारा धोनी जगातील पहिला यष्टीरक्षक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Records in Ind vs Eng last T20 match