दारूण पराभवानंतर ऑस्ट्रेलियात पहिली विकेट!

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

होबार्ट : दक्षिण आफ्रिकेकडून सलग दोन कसोटींमध्ये दारूण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श यांनी आज (बुधवार) राजीनामा दिला. तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे सलग तीन वेळा दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका गमाविण्याची वेळ ऑस्ट्रेलियावर आली.

होबार्टमध्ये काल (मंगळवार) दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर डावाने विजय मिळविला. त्यानंतर रॉड मार्श आणि निवड समितीचे इतर सदस्य ट्रेव्हर हॉन्स, मार्क वॉ यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये रॉड मार्श यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. रॉड मार्श यांचा अध्यक्षपदाचा कालावधी पुढील वर्षी जूनपर्यंत होता. 2011 मध्ये मार्श निवड समितीचे सदस्य झाले. त्यानंतर 2014 च्या मेमध्ये त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.

मार्श यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाने मायदेशात भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये विजय मिळविला. शिवाय, 2015 मध्ये झालेली विश्‍वकरंडक स्पर्धाही जिंकली. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाची कामगिरी घसरली. परदेशात झालेल्या मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता मायदेशातही दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला.

"राजीनामा देण्याचा निर्णय माझा स्वत:चा आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने कोणतेही दडपण आणले नाही. संघाची कामगिरी पाहता, आता नव्या विचारांची गरज आहे हे स्पष्टच दिसत आहे. संघबांधणी करण्यासाठी आता काही नवे चेहरेही दिसतील,'' असे रॉड मार्श यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियासाठी जे काही सर्वोत्तम करता येईल, ते करण्याचा मी मनापासून प्रयत्न केला. या कालावधीत प्रशिक्षक, निवड समितीतील सदस्य आणि सर्व खेळाडूंनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. संघ, कर्णधार आणि प्रशिक्षकांना माझ्या शुभेच्छा! आपण पुन्हा एकदा 'ग्रेट' होऊया..!
- रॉड मार्श, ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष

Web Title: Rod Marsh resigns as Chief Selector after loss to South Africa