INDvsBAN : भारताला मोठा झटका; 'या' प्रमुख खेळाडूला झाली दुखापत

वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

- रोहित शर्माला सरावात दुखापत 
- रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त होण्याची अपेक्षा 

नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्ध रविवारी होणाऱ्या पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व सांभाळणाऱ्या रोहित शर्माच्या मांडीला आज सराव करताना दुखापत झाली. सामन्यासाठी अजून 48 तास असल्यामुळे रोहित तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. 

रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याकडून थ्रोडाऊन घेत होता (राठोड चेंडू फेकत होते त्यावर रोहित सराव करत होता) बाजुच्या नेटमध्ये श्रीलंकेचा नुवान सेनेविर्ताने सराव करत होता त्यावेळी एक चेंडू रोहितच्या डावा मांडीवर गुडघ्याच्या काहीसा वर जोरात लागला. 

रोहितने लगेचच सराव सोडला आणि त्यानंतर तो संघाच्या सरावात सहभागी झाला नाही. रोहितच्या या दुखापतीसंदर्भात संघ व्यवस्थापनाकडून अधिकृतपणे काह कळवण्यात आले नाही, परंतु विश्रांतीसाठी पुरेसा वेळ असल्यामुळे तो रविवारी मैदानात उतरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या मालिकेतून विराटने विश्रांती घेतलेली असल्यामुळे कर्णधार आणि भरवशाचा फलंदाज म्हणून रोहितवर मोठी जबाबदारी आहे. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत धावांचा रतिब घातल्यामुळे रोहित चांगल्या फॉर्मातही आहे. 

धावांची उभारणी महत्वाची 
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक ट्‌वेन्टी-20 सामना महत्वाचा आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी धावांची उभारणी कशी करायची यावर आम्ही भर देणार आहोत असे नेटमध्ये सरावास येण्यापूर्वी फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड पत्रकार परिषदेत म्हणाले. आमची ही बाजू कमजोर आहे. धावांचा पाठलाग करताना आम्ही ताकदवर आहोत पण प्रथम फलंदाजीत आम्ही थोडे कमी पडत आहोत यामध्ये आम्हाला प्रगती करायची आहे, असे राठोड म्हणाले. 

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला सामोरे जाताना संघात घाऊक बदल आणि मोठे प्रयोग आम्ही करणार नाही. मोठे बदल घातकही ठरू शकतात. कोअर टीम तयार करून त्यातच बदल करणे उचित ठरणार आहे त्यामुळे संघ रचना बाधित होणार नाही, असे राठोड यांनी सांगितले. 

कडवी लढत अपेक्षित 
आयसीसीच्या बंदीमुळे शबिक अल हसन आणि दुखापतीमुळे तमिम इक्‍बाल असे दोन प्रमुख खेळाडू नसण्याचा परिणाम होऊ शकतो, परंतु ट्‌वेन्टी-20 प्रकारात कोणताही खेळाडू सामन्याला कलाटणी देऊ शकतो. बांगलादेश संघात असे काही खेळाडू आहेत त्यामुळे त्यांच्याकडून कडव्या लढतीची अपेक्षा असल्याचे राठोड म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma gives India injury scare