धोनीच्या कृतीमुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा

वृत्तसंस्था
Wednesday, 18 July 2018

भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासह मालिका गमावली. त्यानंतर पंचांनी ड्रेसिंगरुमकडे परतणाऱ्या धोनीला चेंडू देणे, सहकाऱ्यांनी त्याला पुढे जाण्यास मार्ग मोकळा करणे हे सगळे थेट प्रक्षेपणानंतर होणाऱ्या चर्चेत सातत्याने दाखवले जात होते आणि प्रत्येक वेळेस त्याच्या निवृत्तीची चर्चा केली जात होती. 

नवी दिल्ली :  इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय मालिकेनंतर ड्रेसिंगरुमकडे परतताना भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याने पंचांकडून चेंडू मागून घेतला. धोनीचा त्या मागे काय विचार होता माहित नाही. पण, या कृतीमुळे त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीच्या चर्चेला मात्र सुरवात झाली. 
भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासह मालिका गमावली. त्यानंतर पंचांनी ड्रेसिंगरुमकडे परतणाऱ्या धोनीला चेंडू देणे, सहकाऱ्यांनी त्याला पुढे जाण्यास मार्ग मोकळा करणे हे सगळे थेट प्रक्षेपणानंतर होणाऱ्या चर्चेत सातत्याने दाखवले जात होते आणि प्रत्येक वेळेस त्याच्या निवृत्तीची चर्चा केली जात होती. 

कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर धोनी एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळत होता. मात्र, अलिकडे त्याच्या संथ खेळामुळे धोनी आपली ओळख हरवून बसला अशी टिका त्याच्यावर होत होती. इंग्लंडमधील अखेरच्या दोन सामन्यात नेमक्‍या धोनीकडून संथ खेळी झाल्या आणि पुन्हा टिकेने जोर धरला होता. अर्थात, कर्णधार कोहलीने असे का होते ? असा प्रश्‍न उपस्थित करून धोनीची बाजू घेतली होती. 
 
धोनीची त्या वेळची कृती आणि आताची... 
धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या अखेरच्या सामन्यानंतर धोनीने पंचांकडून यष्टिमागून घेतली होती. त्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. या वेळे त्याने चेंडू मागून घेतला. या दोन्ही कृतींची सांगड घातली जाऊन धोनीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीची चर्चा रंगू लागली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumors of Dhoni's retirement