संघर्षपूर्ण लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय

रॉयटर्स
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

विजयासाठी 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डिव्हिलर्स (नाबाद 37) आणि अँडिल फेहलुकवायो (नाबाद 29) यांच्यात 43 चेंडूंत झालेली 54 धावांची नाबाद भागीदारी निर्णायक ठरली

हॅमिल्टन - एरवी आक्रमक खेळणाऱ्या कर्णधार एबी डिव्हिलर्सच्या संयमी आणि शांत खेळाने दक्षिण आफ्रिका संघाने रविवारी पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला.

पावसाने 34 षटकांच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 7 बाद 207 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने 33.5 षटकांत 6 बाद 210 धावा केल्या.

विजयासाठी 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डिव्हिलर्स (नाबाद 37) आणि अँडिल फेहलुकवायो (नाबाद 29) यांच्यात 43 चेंडूंत झालेली 54 धावांची नाबाद भागीदारी निर्णायक ठरली. दक्षिण आफ्रिकेने 14 षटकांत 1 बाद 117 अशी झकास सुरवात सुरवात केली होती. पण, नंतर 14 चेंडूंत चार विकेट झटपट गमावल्यामुळे त्यांचा डाव 5 बाद 126 असा अडचणीत आला. त्या वेळी सर्वप्रथम कर्णधार डिव्हिलर्सला ख्रिस मॉरिसने साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या. त्यानंतरही अखेरच्या दोन षटकांत दक्षिण आफ्रिकेला 22 धावा हव्या होत्या. या वेळी अँडिलने एकदा बोल्ट आणि एकदा साऊदीला षटकार ठोकून समीकरण सोपे केले. एक चेंडू बाकी असताना डिव्हिलर्सने चौकार ठोकून विजय साकार केला.

त्यापूर्वी कर्णधार केन विल्यम्सन (59), डीन ब्राऊनली (31) आणि शेवटी ग्रॅंडहोम (34) यांच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडला 207 धावांची मजल शक्‍य जाली. दक्षिण आफ्रिकेकडून ख्रिस मॉरिसने 4 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः
न्यूझीलंड ः 34 षटकांत 7 बाद 207 (केन विल्यम्सन 59, डीन ब्राऊनली 31 ग्रॅंडहोम नाबाद 34, ख्रिस मॉरिस 4-62, कागिसो रबाडा 2-31) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका ः 33.5 षटकांत 6 बाद 210 (क्वींटॉन डी कॉक 69, हशिम आमला 35, डिव्हिलर्स नाबाद 37, फेहलुकवायो नाबाद 29, टीम साऊदी 2-47)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: S. Africa defeats New Zealand