'कॅप्टन कूल'ची टॉप 5 विजेतेपदे

सचिन निकम
गुरुवार, 5 जानेवारी 2017

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार, 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कसोटीतून यापूर्वीच निवृत्ती घेतलेल्या धोनीच्या कारकिर्दीचा अखेर जवळ आल्याचे हे संकेत आहेत. धोनीने भारतीय क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघनिवडीसाठी धोनी उपलब्ध असला तरी त्याच्या चाणाक्ष निर्णयाची झलक आता पाहायला मिळणार नाही. 

धोनीच्या कारकीर्दीतील महत्वाचे टप्पेः
1. ICC T20: 2007 
2. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा ODI सिरिजः 2008 
3. ICC World Championship: 2011
4. Champions Trophy: 2013 
5. Asia Cup T20: 2016 

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार, 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कसोटीतून यापूर्वीच निवृत्ती घेतलेल्या धोनीच्या कारकिर्दीचा अखेर जवळ आल्याचे हे संकेत आहेत. धोनीने भारतीय क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघनिवडीसाठी धोनी उपलब्ध असला तरी त्याच्या चाणाक्ष निर्णयाची झलक आता पाहायला मिळणार नाही. 

धोनीने कसोटी क्रिकेटमधून डिसेंबर 2014 मध्येच निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने फक्त एकदिवसीय व ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद भूषविले. त्याला पर्याय म्हणून समोर आलेल्या विराट कोहलीने आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याची जागा घेण्यास सुरवात केली. आता धोनीनंतर कोहलीकडेच एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद जाणार हे निश्चित असले तरी, धोनीची ती 'कॅप्टन कूल' प्रतिमा जपणे कठीण आहे. धाडसी निर्णय, युवा खेळाडूंवर विश्वास, उत्तुंग फटके मारण्याची क्षमता अशा अनेक कारणांमुळे धोनी नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहिला.

काय आहेत धोनीच्या कारकीर्दीतील महत्वाचे टप्पे?

  • 1. ICC T20

दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या आयसीसी ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला मिळाले. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व सौरव गांगुली या तीन महारथी संघात सहभागी नसताना धोनीने युवा खेळाडूंना घेऊन भारताला विजेतेपद मिळवून दिले. लांब केस, उत्तुंग फटके आणि यष्टीरक्षणाची जबाबादारी यामुळे धोनीची ओळख क्रिकेटविश्वाला झाली. पाकिस्तानसारख्या पारंपारिक प्रतिस्पर्ध्याविरोधात अंतिम सामन्यात खेळताना धोनीने जोंगिदर शर्मा या नवख्या गोलंदाजाला अखेरचे षटक टाकण्यास देणे आणि त्याने संघाला विजय मिळवून देणे हे भारतीय क्रिकेटसाठी नवखे होते.

  • 2. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला मालिका विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2008 मध्ये त्यांच्याच मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने केला. ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्यात अपयशी ठरल्याची परंपरा धोनीने मोडीत काढली. कसोटी मालिका गमाविल्यानंतर एकदिवसीय मालिकाही भारतीय संघ गमाविणार हे जवळपास निश्चित होते. पण, धोनीच्या नेतृत्वाखालील अनुभवी व युवा खेळाडूंचा मिलाप असलेल्या संघाने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया व श्रीलंकाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या तिरंगी मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तीन अंतिम सामन्यांपैकी दोन अंतिम सामने जिंकणारा संघ विजयी. पण, भारतीय संघाने पहिले दोन अंतिम सामने जिंकत ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास घडविला.

  • 3. ICC World Championship

धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 2011 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक जिंकत 27 वर्षांचा दुष्काळ हटविला. मायदेशात झालेल्या या स्पर्धेत श्रीलंकेला अंतिम सामन्यात पराभूत करून विश्वकरंडक जिंकण्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे स्वप्नही साकार झाले. युवराजसिंगची अष्टपैलू कामगिरी, सचिनचे मार्गदर्शन आणि झहीरची गोलंदाजी ही जरी विशेष असली तरी, धोनीने अखेरपर्यंत केलेली 79 चेंडूतील
91 धावांची खेळी कोणीच विसरू शकत नाही. हेलिकॉप्टर शॉट मारत खेचलेला षटकार हा अजूनही नागरिकांच्या स्मरणातून गेलेला नाही.

  • 4. Champions Trophy

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकून धोनीने 2013 मध्ये खऱ्या अर्थाने आयसीसीच्या सर्व स्पर्धांचे विजेतेपद मिळविणारा कर्णधार म्हणून नाव केले. चॅम्पियन्स करंडकात यापूर्वी 2002 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताला श्रीलंकेसह संयुक्त विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण, त्यानंतर धोनीलाच ही स्पर्धा भारताला जिंकून देण्यात यश आले. इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान या संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना पावसामुळे 20-20 षटकांचा झाला आणि समोर यजमान इंग्लंडचा संघ होता. या सामन्यातही धोनीने आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत ईशांत शर्माकडे चेंडू सोपविला. त्यानेच धोनीचा निर्णय सार्थ ठरवत मिळविलेल्या बळींमुळे भारताला विजेतेपद मिळाले.

  • 5. Asia Cup T20

2016 मध्ये आशिया करंडक टी-20 स्पर्धा भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली. पहिल्यांदाच टी-20 प्रकारात झालेल्या आशिया करंडकात भारतीय संघाची कामगिरी सर्व स्तरावर सरस ठरली. या विजेतेपदामुळे भारतीय संघाने टी-20 जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. पाकिस्तानसह सर्व प्रमुख संघांचे आव्हान मोडीत काढत भारतीय संघाने अंतिम सामन्यात यजमान बांगलादेशचे आव्हान मोडीत काढले. धोनी आणि कोहली यांच्या संघाने विजेतेपद मिळवीत असताना शेर-ए-बांगला स्टेडियमवरील प्रेक्षक शांत होते. पण, हाच विजय धोनीने कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपविल्याचा जणू संकेत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Nikam write about MS Dhoni Resigns as Captain

फोटो गॅलरी