चेंडू कुरतडणारे ऑस्ट्रेलियन 'उंदीर'

Wednesday, 28 March 2018

चेंडू कुरतडणे म्हणजे काय?
कसोटी सामन्यांमध्येच सर्रास चेंडू कुरतडण्याचे प्रकार घडत असतात. चेंडू जुना झाल्यानंतर शिलाईच्या एका बाजूने त्याला घासून शाईन आणली जाते आणि दुसऱ्या बाजूने चेंडू जेवढा खराब करता येईल तेवढा खराब करण्यास क्रिकेटपटूंकडून सुरवात होते. त्यामुळे गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळतो आणि गोलंदाजांना बळी मिळतात. चेंडूला नखाच्या साहाय्याने, पेपरचा वापर करून किंवा इतर काही साधनांचा वापर करून खराब करून त्यामध्ये पाणी मुरविण्याचा प्रयत्न केला जाते. त्यामुळे चेंडू एका बाजूला हलकासा जड होऊन इन स्विंग किंवा आऊट स्विंग होण्याची शक्यता जास्त असते. क्रिकेटमध्ये परवानगी नसणारा हा प्रकार आतापर्यंत अनेकवेळा घडला आहे. पण, गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून आपला लौकीक पुन्हा मिळविण्यासाठी जो काही प्रय़त्न केला जात आहे, तो केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.

आपल्या कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत अव्वल स्थान राखणारे आणि कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता असलेल्या ऑ्स्ट्रेलियन क्रिकेटपटूंची जशी खेळात पिछेहाट होत गेली, तशीच त्यांच्या क्रिकेटच्या मैदानावर खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी होत असलेली ओळख आणखी गडद होत गेली. स्लेजिंगसाठी तरबेज असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची आता नवी ओळख कुडतडणारे क्रिकेटपटू अशी ओळख झाल्याने कांगारुंसाठी प्रसिद्ध असलेल्या देशात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे.

ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे, की ज्या संघाने कायमच आपल्या सरस कामगिरीच्या जोरावर सर्वाधिकवेळा विश्वकरंडकावर, जागतिक क्रमवारीवर आपले वर्चस्व राखले आहे. स्टीव्ह वॉ, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, रिकी पाँटिंग, ऍड्म गिलख्रिस्ट या दिग्गज क्रिकेटपटूंच्या कामगिरीने 20 व्या शतकात त्यांनी इतर कोणत्याही संघाला वरचढ ठरू दिले नाही. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडे अनेक महान क्रिकेटपटू होते. त्यांचाच वारसा या प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी पुढे चालू ठेवला. अगदी आता 21 व्या शतकात मायकेल क्लार्कनेही पाँटिंगकडून मिळालेली कर्णधारपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली. पण, स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्व गेल्यापासून ऑस्ट्रेलियाच्या संघाची सर्वच बाबतीत पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. क्रमवारीत कायम अव्वल स्थानावर राहिलेला ऑस्ट्रेलिया आता पहिल्या तीन संघांमध्येही स्थान मिळवू शकत नाही. याचाच परिणाम की काय फक्त स्लेजिंग करून समोरिल संघातील खेळाडूंना त्रास देणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या डोक्यात आता चेंडू कुरतडून सामन्यावर वर्चस्व मिळवावे अशा कल्पना येऊ  लागल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरुन बँक्रॉफ्ट याने सामना आपल्या हातून निसटत असल्याचे पाहून थेट चेंडूवर सँड पेपर (पॉलिश पेपर) घासत असल्याचे कॅमेरामनने टिपले. त्याच्या लक्षात येताच त्याने हा पेपर पॅन्टमध्ये टाकला. पण, कॅमेरामनने हे सर्व टिपल्याने ऑस्ट्रेलियन उंदीरांचा कुरतडण्याचा डाव जगासमोर उघड झाला. येथून खरा खेळ सुरु झाला. विशेष म्हणजे कर्णधार स्टीव्ह स्मिथ या सर्वाच्या समर्थनार्थ पुढे आला. यावरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सामन्यासाठी काय, काय युक्त्या करू शकतील हे सर्वांनी पाहिले. या घटनेमुळे नुकत्याच झालेल्या ऍशेस मालिकेत हाच बँक्रॉफ्ट खिशामध्ये चेंडूचा आकार बदलण्यासाठी साखर घेऊन घेल्याचा आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा हा प्रताप कॅमेरामनने टिपला नसता तर हे उघडच झाले नसते आणि ऑस्ट्रेलियन उंदीराला पुन्हा एकदा वाटले असते आपण कुरतडत आहोत पण आपल्याकडे कोणीच पाहत नाही. या उंदरांना आपल्या कॅमेरात टिपणाऱ्या त्या कॅमेरामनचे अखेर आभार मानायला हवेत की ज्याच्यामुळे क्रिकेटमधील हा विकृत चेहराही समोर आला.

आयसीसीकडून भेदभाव का?
आमच्या संघाने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला. कसोटीवर वर्चस्व मिळविण्याचा आमचा हेतू होता. संघाच्या नेतृत्वाची सुत्रे असलेल्या गटाने (लिडरशीप ग्रुप) मुद्दाम हा डाव रचला, असे उघडउघडपणे कबुली देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर फक्त एक सामन्याची बंदी घालण्याची कारवाई आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) करण्यात आली. हाच प्रकार भारतीय उपखंडात घडला असता तर त्याची शिक्षा नक्कीच वेगळी असती. मंकीगेट प्रकरणात हरभजनलाच दोषी धरून अॅण्ड्रयू सायमंड्सला सोडून देणाऱ्या आयसीसीकडून सतत गोऱ्या क्रिकेटपटूंना झुकतेच माप देण्यात येते. भारतीय क्रिकेटपटूंच्या बाबतीत तर असे अनेकवेळा घडले आहे. पण, अजूनही असे प्रकार कॅमेरात कैद असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होताना दिसत नाही. चेंडू कुरतडण्याचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. पण, आता मिळालेली शिक्षा आणि यापूर्वी अशी कृत्ये करणाऱ्यांना मिळणारी शिक्षा याच खूप तफावत आहे.

चेंडू कुरतडणे म्हणजे काय?
कसोटी सामन्यांमध्येच सर्रास चेंडू कुरतडण्याचे प्रकार घडत असतात. चेंडू जुना झाल्यानंतर शिलाईच्या एका बाजूने त्याला घासून शाईन आणली जाते आणि दुसऱ्या बाजूने चेंडू जेवढा खराब करता येईल तेवढा खराब करण्यास क्रिकेटपटूंकडून सुरवात होते. त्यामुळे गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळतो आणि गोलंदाजांना बळी मिळतात. चेंडूला नखाच्या साहाय्याने, पेपरचा वापर करून किंवा इतर काही साधनांचा वापर करून खराब करून त्यामध्ये पाणी मुरविण्याचा प्रयत्न केला जाते. त्यामुळे चेंडू एका बाजूला हलकासा जड होऊन इन स्विंग किंवा आऊट स्विंग होण्याची शक्यता जास्त असते. क्रिकेटमध्ये परवानगी नसणारा हा प्रकार आतापर्यंत अनेकवेळा घडला आहे. पण, गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून आपला लौकीक पुन्हा मिळविण्यासाठी जो काही प्रय़त्न केला जात आहे, तो केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.

क्रिकेट जगतातून आपले वर्चस्व गमाविलेल्या ऑस्ट्रेलियाकडे आता पूर्वीसारखे गुणवान क्रिकेटपटू राहिलेले नाहीत. तसेच त्यांना कोठेही पराभूत करण्याची क्षमता असलेले भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड असे संघ तयार झाले आहेत. त्यामुळे अशा विविध मार्गाने क्रिकेटवर पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी ऑस्ट्रेलियाची सुरु असलेली धडपड काही कामाची नाही. उलट याचा फटका ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटलाच बसून, युवा खेळाडूंसमोर आदर्श घ्यावे असे क्रिकेटपटू राहणार नाहीत आणि कोणत्यातरी प्रकरणात बंदी भागावी लागलेले खेळाडू त्यांच्यासमोर असतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियन उंदरांनी आणखी बदनामी न होऊ देता दर्जेदार खेळाडू कसे तयार होतील, याकडे लक्ष दिले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Nikam writes about Australian cricket team ball tempering issue