सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन

वृत्तसंस्था
Wednesday, 2 January 2019

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतातील सर्वोत्म क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते. ​

मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतातील सर्वोत्म क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते. 

आचरेकर मुंबईत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायचे. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर, बलविंदर संधू, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, संजय बांगर, रमेश पोवार अशा दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले होते. 

त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.7 फेब्रुवारी 2003 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडा महर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. 2010 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

आचरेकरांनी 1943 साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी यंग महाराष्ट्रा एकादश. गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी केवळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध एकमेव सामना खेळला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar Coach Ramakant Achrekar passes away