मैदानावर नसला तरी सचिन हृदयात

Wednesday, 15 November 2017

दोन तपांच्या वाटचालीत क्रिकेट बदललं. टेस्ट मॅच कमी आणि वन डे जास्त झाल्या. मग ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट आलं. आयपीएलसारखी स्पर्धा सुरू झाली. दोन तपांच्या वाटचालीत देशही बदलला. उदारीकरण आलं. 'फॉरेन'च्या वस्तू फक्त दिल्लीतल्याच नव्हे; गल्लीतल्या दुकानातही मिळू लागल्या. दोन तपांच्या वाटचालीत ब्रँडींग आलं. एखाद्या व्यक्तीच्या भोवती उत्पादनांच्या जाहिराती बनवून उत्पादनं विकली जाऊ लागली. 

वकार युनूस नावाचं तुफान पाटा खेळपट्ट्यांवरही आग ओकायचं, तेव्हाचा तो काळ...
वासिम अक्रमच्या यॉर्करसमोर स्टंपनं विनातक्रार मान तुकवायचा तो काळ...
अब्दुल कादीरचा चेंडू हवेतल्या हवेत जणू अदृष्य होत पॅडवर आपटायचा तो काळ...
इम्रान खान नावाचा दरारा टीपेला पोहोचण्याचा तो काळ...

सचिन तेंडूलकर नावाचं युग क्रिकेटच्या कॅलेंडरमध्ये सुरू झालं तोच हा काळ. आज 15 नोव्हेंबर क्रिकेटमधल्या 'सचिन' युगाच्या प्रारंभाला तब्बल 28 वर्षे पूर्ण झाली. या 'युगा'नं क्रिकेटच्या मैदानावरून स्वतःला दूर करण्याचा निर्णय घेऊन चार वर्षे लोटलीत. मात्र, सचिन तेंडूलकर नावाचं 'युग' कधी संपणार नाही याची साक्ष आजही मैदानावर सचिनची पुसटशी सावली जरी दिसली, तरी लाखो चाहत्यांच्या उत्साहाला येणाऱया उधाणातून मिळते. 

पाकिस्तानातली ती चार कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली. चार एकदिवसीय सामन्यांपैकी दोन भारताने गमावले आणि दोन पावसामुळे अर्धवट राहिले. मात्र, हा निकाल कधी कोणाच्या लक्षात राहिला नाही. कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कोरला गेला तो सचिन तेंडूलकर. पहिल्या कसोटीत 15, दुसऱया कसोटीत 59, 8, तिसऱया कसोटीत 41 आणि चौथ्या कसोटीत 35, 57 या काही फार ग्रेट धावा नव्हत्या; कारण टीममध्ये नवज्योतसिंग सिद्धू, के. श्रीकांत, संजय मांजरेकर आणि अजहरसारखे दिग्गज होते. सुनिल गावसकरच्या निवृत्तीची उणिव होती; मात्र कपिल देव, मनोज प्रभाकरसारखे अष्टपैलू टीमचा आधार होते. 

फरक एकच होता. सचिनचं वय होतं अवघं सोळा. शब्दशः मिसरूड न फुटलेल्या वयात वकार, अक्रम आणि इम्रान यांच्यासारख्या जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांसमोर धीटपणानं उभं राहणं इतकंच पुरेसं होतं. सचिनला फक्त उभं राहायचं नव्हतं. या तोफा ओकणाऱया गोलंदाजांना सीमापार धाडायचं होतं. सचिन ते करू शकला. कादीरसारख्या खडूस लेगस्पीनरकडून शाब्बासकी मिळवू शकला आणि पुढची चोवीस वर्षे क्रिकेट खेळणाऱया प्रत्येक देशातील कोट्यवधी चाहत्यांचा 'आयकॉन' बनला. 
 
दोन तपांच्या वाटचालीत क्रिकेट बदललं. टेस्ट मॅच कमी आणि वन डे जास्त झाल्या. मग ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट आलं. आयपीएलसारखी स्पर्धा सुरू झाली. दोन तपांच्या वाटचालीत देशही बदलला. उदारीकरण आलं. 'फॉरेन'च्या वस्तू फक्त दिल्लीतल्याच नव्हे; गल्लीतल्या दुकानातही मिळू लागल्या. दोन तपांच्या वाटचालीत ब्रँडींग आलं. एखाद्या व्यक्तीच्या भोवती उत्पादनांच्या जाहिराती बनवून उत्पादनं विकली जाऊ लागली. 

सचिन या सगळ्यांमध्ये स्वतःला बदलत राहिला. काळाबरोबर राहात राहिला. टेस्ट मॅचमध्ये जो बॉल डिफेन्स करायचा असतो, तो ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सीमापार करावाच लागतो, इतकी समज त्याच्यात होती. त्यानं बदल केले. स्वतःचं 'युग' अबाधित राहिल याची पुरेशी काळजी घेत सचिननं नेहमी 'वादातित' राहण्याचा प्रयत्न केला. कपील देववर मॅच फिक्सिंगचे आरोप मनोज प्रभाकरनं केल्यानंतरच्या काळात जसा सचिन वादाबाहेर राहिला, तसाच अजहरच्या मॅच फिक्सिंगच्या प्रकरणातही त्यानं स्वतःला बाजूला ठेवलं. 'सचिन भूमिका घेत नाही,' ही टीका त्यानं पचवली. मैदानाबाहेर तोंडावर नियंत्रण आणि मैदानावर खेळातून उत्तर हा सचिनचा यशाचा फॉर्म्युला. निवृत्तीनंतरही सचिननं कदाचित हाच फॉर्म्युला कायम ठेवला असावा. त्यामुळंच आज मैदानावर सचिन नसला, तरी चाहत्यांच्या हृदयात कायम आहे.

सचिनच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे :

 • 23 ते 25 फेब्रुवारी 1988 : सोळा वर्षीय विनोद कांबळीबरोबर चौदा वर्षीय सचिनची 664 धावांची भागीदारी. शारदाश्रमाच्या या जोडीने केलेला हा विक्रम 18 वर्षे जागतिक स्तरावरही अबाधित होता. 
 • 11 डिसेंबर 1988 : पंधराव्या वर्षी रणजी पदार्पणात शतक. नेटमध्ये कपिलदेवच्या चेंडूंचा सचिनने ज्या पद्धतीने सामना केला ते पाहून कर्णधार दिलीप वेंगसरकरने त्याची मुंबईच्या संघात निवड केली. 
 • 15-20 नोव्हेंबर 1989 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे पदार्पण, वकार युनुसचा उसळता चेंडू नाकावर बसला, सचिन कोलमडला. नाकातून येणारे रक्त पुसून मैदानात सामना करण्यास सज्ज झाला. एवढेच नव्हे तर 57 धावांची खेळी केली. 
 • 14 ऑगस्ट 1990 : कसोटीतील पहिले शतक. त्या वेळी वय 17 वर्षे 112 दिवस. या शतकामुळे भारताने ओल्ड ट्रॅफर्डवरील कसोटी अनिर्णित राखली. सचिनच्या सर्वोत्तम खेळीत अजूनही अनेक जण याची गणना करतात. 
 • 2-3 फेब्रुवारी 1992 : भारताची वॅकाच्या उसळत्या खेळपट्टीवर 8 बाद 159 अशी अवस्था; पण या पडझडीत टिकलेल्या सचिनचा प्रतिहल्ला, 161 चेंडूत 16 चौकारांसह 114. 
 • एप्रिल 1992 : यॉर्कशायरने करारबद्ध केले, या कौंटीकडून खेळणारा पहिला परदेशी खेळाडू. 
 • 27-28 नोव्हेंबर 1992 : कसोटीत एक हजार धावांचा टप्पा गाठलेला सर्वात लहान खेळाडू ठरला. त्याच वेळी आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या या कसोटीत 111 धावांमुळे भारत 227. 
 • 11-12 फेब्रुवारी 1993 : भारतातील अखेर पहिले कसोटी शतक, 24 चौकार व एका षटकारासह इंग्लंडला 165 धावांचा तडाखा. 
 • 24 नोव्हेंबर 1993 : सचिनच्या जादुई हाताची कमाल अनुभवली. आफ्रिकेला अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावा हव्या असताना सचिनने अवघ्या तीनच धावा दिल्या. 
 • 27 मार्च 1994 : वन-डेत पहिल्यांदा सलामीला, न्यूझीलंडविरुद्ध 49 चेंडूत 82. 
 • ऑक्‍टोबर 1995 : वर्ल्ड टेलसह 31.5 कोटींचा करार, त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू झाला. 
 • फेब्रुवारी-मार्च 1996 : भारतीय उपखंडातील विश्‍वकरंडकात 87.16 च्या सरासरीने 523 धावा. 
 • 8 ऑगस्ट 1996 : तेविसाव्या वर्षी भारताचा कर्णधार, पण 2 जानेवारी 1998 रोजी कर्णधारपदावरून उचलबांगडी. त्या कालावधीत 17 पैकी तीनच कसोटीत भारताचा विजय. 
 • फेब्रुवारी-मार्च 1998 : पहिले कसोटी द्विशतक झळकावले, तसेच मालिकेत दोन शतके व एक अर्धशतक. 
 • 22 व 24 एप्रिल 1998 : शारजात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन झंझावती शतके. पाठीच्या दुखापतीने बेजार असतानाही भारताच्या 271 पैकी 136 धावा केल्या. भारत विजयापासून 17 धावा दूर असताना सचिन बाद, 13 धावांनी भारताची हार. 
 • 20 मार्च 2001 : ऑस्ट्रेलियाची भारतात हार. निर्णायक कसोटीत सचिनचे शतक, कांगारूंची विजयी मालिका खंडित. 
 • 31 मार्च 2001 : एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू. 
 • 19 नोव्हेंबर 2001 : चेंडू कुरतडल्याचा आरोप ठेवत सामनाधिकारी माईक डेनिस यांनी सचिनला दंड केला. भारत व आयसीसीमध्ये वितुष्ट. अखेर सामनाधिकाऱ्यांच्या कक्षा निश्‍चित करण्यात आल्या. 
 • 21 डिसेंबर 2001 : कसोटीत प्रथमच यष्टिचीत. ऍश्‍ले गाईल्सने चकविल्यामुळे पुन्हा एकदा डावखुरा फिरकी गोलंदाज सचिनची डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा. 
 • 22-23 ऑगस्ट 2002 : डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम मागे टाकला, त्या वेळी सचिनचे द्विशतक सात धावांनी हुकले. 
 • फेब्रुवारी-मार्च 2003 : आफ्रिकेतील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत उपविजेता, सचिन तेंडुलकर स्पर्धेत सर्वोत्तम. 
 • ऑगस्ट 2003 : सचिनच्या फेरारीवर करमाफी दिल्याने गदारोळ, अखेर 2 लाख 45 हजार डॉलर कर भरण्याची तयारी दाखवली. 
 • 2 ते 4 जानेवारी 2004 : प्रथमच एकही कव्हरड्राइव्ह न मारता शतक, सिडनीत नाबाद 241 धावांची खेळी सचिनच्या मते सर्वोत्तम खेळी. 
 • 28-29 मार्च 2004 : सचिन 194 धावांवर असताना भारताने डाव सोडला. मुलतान कसोटीतील विजयासाठी भारतीय संघाचा हा निर्णय, सचिनच्या निर्णयावर टीका. 
 • ऑगस्ट 2004 : हॉलंडमधील स्पर्धेच्या वेळी टेनिस एल्बो दुखावला. चॅम्पियन्स करंडक, तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटीस मुकला, त्यानंतर अनेकदा दुखापतीमुळे स्पर्धा व मालिकेस मुकावे लागले. 
 • 16 मार्च 2005 : कसोटीतही दहा हजार धावांचा टप्पा गाठला. 
 • 10 डिसेंबर 2005 : कसोटीतील सर्वाधिक शतके करणारा भारतीय होताना सुनील गावसकरला (34) मागे टाकले. 
 • 19 मार्च 2006 : 33 मिनिटांत एकच धाव केल्यामुळे वानखेडेवर हुर्यो. 
 • मे 2007 : बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील मालिकेच्या वेळी विश्रांती देण्यात आली. त्यानंतरच्या दोन कसोटीत शतके. 
 • 4 जानेवारी 2008 : तब्बल दोन वर्षे आणि 19 कसोटींनंतर शतक, ही कामगिरी सिडनीत. 
 • 2 मार्च 2008 : तिरंगी स्पर्धेतील पहिल्या अंतिम सामन्यात शतक. 
 • 17 ऑक्‍टोबर 2008 : ब्रायन लाराचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम सचिनने मागे टाकला. 
 • 24 फेब्रुवारी 2010 : ग्वाल्हेरला वन डे द्विशतक. 
 • ऑक्‍टोबर 2010 : पहिला आयसीसी पुरस्कार जिंकला, एका आठवड्यातच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. 
 • 19 डिसेंबर 2010 : आफ्रिकन मारा रोखताना सेंच्युरीयनला शतक, त्याच वेळी कसोटी शतकांचे अर्धशतक. 
 • 2 एप्रिल 2011 : विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण. 
 • 16 मार्च 2012 : बांगलादेशविरुद्धच्या आशिया कप लढतीत शतक, हे सचिनचे शंभरावे शतक. 
 • 23 डिसेंबर 2012 : सचिनचा एकदिवसीय सामन्यांना निरोप
 • 14-16 नोव्हेंबर 2013 : वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरचा कसोटी सामना

-------------------
कसोटी कारकिर्द
200 सामने, 329 डाव, 15921 धावा, 53.78 सरासरी, 51 शतके, 68 अर्धशतके, नाबाद 248 सर्वाधिक धावा

एकदिवसीय कारकिर्द 
463 सामने, 18426 धावा, 44.83 सरासरी, 49 शतके, 96 अर्धशतके, नाबाद 200 सर्वाधिक धावा

ट्वेंटी-20 कारकिर्द
1 सामना, 10 धावा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar debut in international cricket

फोटो गॅलरी