भेट रंगली मास्टरची ब्लास्टर बरोबर

सुनंदन लेले
शनिवार, 8 एप्रिल 2017

पुणे - व्यक्तिमत्त्व शब्दाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर सर व्हिवीयन रिचर्डस यांचे नाव झटकन डोळ्यासमोर येते. क्रिकेट जग ज्याला आदराने "किंग' म्हणून ओळखते तेच सर रिचर्डस गोवा फेस्टमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिने सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

पुणे - व्यक्तिमत्त्व शब्दाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर सर व्हिवीयन रिचर्डस यांचे नाव झटकन डोळ्यासमोर येते. क्रिकेट जग ज्याला आदराने "किंग' म्हणून ओळखते तेच सर रिचर्डस गोवा फेस्टमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिने सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

रिचर्डस या प्रवासात मुंबईत थांबले आणि एका मास्टरची एका ब्लास्टरसोबत भेट रंगली. होय ! सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या या बादशाहची भेट घेण्यासाठी खास वेळ काढला होता.

कॅरेबियन भूमीत 2007 मध्ये विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ साखळीतूनच बाहेर फेकला गेला. सहाजिकच सचिन निराशेच्या गर्तेत अडकला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापर्यंत त्याने विचार केला होता. त्या वेळी आपल्या जमान्यात गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणाऱ्या रिचर्डस यांनी सचिनला फोन करून त्याची समजूत काढली होती. "अजून तुझ्यापुढे खूप क्रिकेट शिल्लक आहे. चांगले दिवस अजून यायचे आहेत, असे समज आणि क्रिकेट सोडायचा विचारही करू नकोस,' असा सल्ला त्यांनी सचिनला दिला आणि सचिन मरगळ झटकून उभा राहिला. त्यानंतर त्याच्या बॅटचा चमत्कार अवघ्या क्रिकेट विश्‍वाने पाहिला.

रिचर्डस मुंबईत आहेत म्हटल्यावर सचिनला रहावले नाही. त्याने त्यांना आपली गाडी पाठवून घरी बोलावून घेतले. त्या वेळी सचिनचे सासरे, दोन्ही भाऊ अजित आणि नितीन उपस्थित होते. जवळपास अडीच तासांच्या भेटीत त्यांच्या काळातील क्रिकेटपासून, सचिन युग आणि अलीकडचे "स्लेजिंग' युद्ध यावर त्यांनी मनमुराद चर्चा केली. केवळ क्रिकेटच नाही, तर सचिनची "म्युझिक रुम' बघून दोघांच्यात संगीतावरदेखील गप्पा रंगल्या. या गप्पा अनुभवताना रिचर्डस आणि सचिन फलंदाजी करताना त्यांच्या बॅटमधून येणारा आवाज हा "साउंड ऑफ म्युझिक' असायचा याची खात्री पटली.

Web Title: sachin tendulkar & viv richards visit