esakal | साहची कारकीर्दच धोक्‍यात
sakal

बोलून बातमी शोधा

sahas career in danger

भारतीय संघाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साह "आयपीएल'दरम्यान अंगठा दुखावल्यामुळे जखमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता इंग्लंड दौऱ्यालाही त्याला मुकावे लागल्यावर त्याची खरी दुखापत समोर येत आहे. साहच्या अंगठ्याला नव्हे, तर खांद्याला दुखापत झाली असून, ही दुखापत आता इतकी बळावली आहे, की त्यावर शस्त्रक्रिया हाच अखेरचा पर्याय शिल्लक राहिला आहे. 

साहची कारकीर्दच धोक्‍यात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारतीय संघाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साह "आयपीएल'दरम्यान अंगठा दुखावल्यामुळे जखमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता इंग्लंड दौऱ्यालाही त्याला मुकावे लागल्यावर त्याची खरी दुखापत समोर येत आहे. साहच्या अंगठ्याला नव्हे, तर खांद्याला दुखापत झाली असून, ही दुखापत आता इतकी बळावली आहे, की त्यावर शस्त्रक्रिया हाच अखेरचा पर्याय शिल्लक राहिला आहे. 

साहच्या दुखापतीबाबत समोर आलेल्या माहितीवरून "बीसीसीआय'देखील याबाबत अंधारात राहिल्याचेच दिसून येत आहे. अंगठ्याची दुखापत बरी होण्यास इतका वेळ कसा लागतो हा साधा प्रश्‍न कुणाला पडला नाही आणि कुणी त्याची चौकशी केली नाही, असे एका पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. राष्ट्रीय अकादमीतील फिजिओ आणि भारतीय संघाबरोबर असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची दुखापत लपवल्याचीच आता चर्चा होत आहे. निवड समितीचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांनाही साहच्या दुखापतीबाबत अंधारात ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय अकादमी सोडा, भारतीय संघ फिजिओकडूनही त्याच्या दुखापतीबाबत साधा अहवाल देण्यात आला नाही. आता एकदम त्याची दुखापत गंभीर असल्याचेच समोर येत आहे. 

साहच्या दुखऱ्या खांद्यावर शस्त्रक्रिया हाच अखेरचा पर्याय उरला असून, पुढील महिन्यात लंडनमध्येच ही शस्त्रक्रिया होणार असल्याचे समजते. यानंतर त्याला दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्यामुळे त्याला आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसही मुकावे लागणार आहे. एका पदाधिकाऱ्याने तर साहचे पुनरागमन कधी होईल हे सांगता येत नाही, अशी टिप्पणी केली आहे. 

भुवनेश्‍वर तीन कसोटींना मुकणार 
भारतीय संघाचे आशास्थान असणारा गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारला इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांना मुकावे लागणार आहे. भुवनेश्‍वर मायदेशी परतणार असून, राष्ट्रीय अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात तो सहभागी होईल. यादरम्यान तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यास मालिकेतील अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकेल, असे "बीसीसीआय'चे म्हणणे आहे. इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघास हा धक्का आहे. जसप्रीत बुमरादेखील पहिल्या नाही, तर दुसऱ्या कसोटीसही मुकणार असल्याची चर्चा आहे. 

loading image