आयपीएल: मुंबई इंडियन्सविरुद्ध सॅम्युअल बद्रीची हॅटट्रिक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

ही यंदाच्या आयपीएलमधील पहिलीच हॅटट्रिक आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा बद्री हा दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी 2009 मध्ये तत्कालीन डेक्कन चार्जर्सच्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या अभिषेक नायर-हरभजनसिंग आणि जेपी ड्युमिनी या तिघांना लागोपाठ बाद केले होते.

बंगळूर: विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलर्स असे धडाकेबाज फलंदाज असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाला अवघ्या 142 धावांमध्ये रोखण्यात यशस्वी झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला सॅम्युअल बद्रीने सुरवातीलाच धक्के दिले. मुंबईच्या डावातील दुसऱ्याच षटकात सॅम्युअल बद्रीने पार्थिव पटेल, मिशेल मॅक्‍लनघेन आणि रोहित शर्मा या तिघांना बाद करत हॅटट्रिक केली. 

ही यंदाच्या आयपीएलमधील पहिलीच हॅटट्रिक आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा बद्री हा दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी 2009 मध्ये तत्कालीन डेक्कन चार्जर्सच्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या अभिषेक नायर-हरभजनसिंग आणि जेपी ड्युमिनी या तिघांना लागोपाठ बाद केले होते.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले. खांद्याच्या दुखापतीमुळे सुरवातीचे काही सामने संघाबाहेर राहावे लागलेल्या विराट कोहलीचे या सामन्याद्वारे पुनरागमन झाले. कोहलीच्या अनुपस्थितीत रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व केलेल्या शेन वॉटसनला आजच्या सामन्यासाठी वगळण्यात आले. 

कोहली आणि गेल या सलामीवीरांनी संयमी सुरवात केली. लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीतही मुंबईच्या गोलंदाजांनी बंगळूरच्या फलंदाजांना रोखून धरले. हरभजनसिंगने चार षटकांत केवळ 23 धावा देत बंगळूरच्या फलंदाजांवरील दडपण वाढविले. संथ आणि संयमी खेळत कोहलीने अर्धशतक झळकावित आपले पुनरागमन साजरे केले. पण त्याचा अपवाद वगळला, तर बंगळूरच्या इतर फलंदाजांना फटकेबाजी करताच आली नाही. बंगळूरच्या डावात चार षटकार आणि सातच चौकार मारण्यात त्यांच्या फलंदाजांना यश आले.

Web Title: Samuel Badree takes hat-trick against Mumbai Indians in IPL 10