esakal | सांगलीचा रणजित भारतीय क्रिकेट संघाच्या उंबरठ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

करसन घावरी यांच्यासोबत रणजित चौगुले.

सांगलीचा रणजित भारतीय क्रिकेट संघाच्या उंबरठ्यावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी शिबिरासाठी निवड

सांगली - महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधनानंतर भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर आता रणजित चौगुले याच्या रूपाने सांगलीच्या आणखी एका ताऱ्याचा उदय होत आहे. त्याची १६ वर्षांखालील संघाच्या भारतीय संघाच्या बंगळूर येथील प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. येत्या २१ ते १३ ऑगस्टदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या शिबिरात  देशभरातील पाच विभागांतील निवडक २५ खेळाडूंचे हे शिबिर होत आहे.

त्याचे पुढचे लक्ष २०१९ मध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून खेळणे हेच असेल. हे शिबिर म्हणजे त्याआधीचा टप्पा आहे. अशा शिबिरासाठी निवड होणारा तो विजय हजारे यांच्यानंतर पहिला सांगलीकर क्रिकेटपटू आहे. 

अवघ्या सोळा वर्षांचा सहा फूट उंची रणजित प्रती ताशी १२५ किलोमीटर वेगाने चेंडू टाकणारा आजघडीला १६ वर्षांखालील भारतीय क्रिकेटमधील आघाडीचा जलदगती गोलंदाज आहे. त्याच्या या वेगातील काही उणीवा दूर केल्या तर तो भारताचा अव्वल जलदगती गोलंदाज  ठरेल, असा विश्‍वास ज्येष्ठ जलदगती गोलंदाज करसन घावरी यांनी नुकताच पश्‍चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या सांगतेवेळी व्यक्त केला. सांगलीतील स्वातंत्र्यसैनिक शंकर रखमाजी चौगुले यांचा नातू असलेल्या रणजितच्या दोघे बंधू अजिंक्‍य आणि निनाद याआधीच राज्य संघात खेळत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत रणजितने गेल्या सहा-सात वर्षांच्या सातत्यानंतर तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे. १६ वर्षांखालील भारतीय संघाच्या २५ खेळाडूंमध्ये त्याची झालेली निवड हा त्याच्या कारकिर्दीसाठी मैलाचा दगड असेल. त्याआधी त्याने हैदराबाद येथील विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. देशाचे एकूण पाच विभाग आहेत. त्यात महाराष्ट्र,  गुजरात, मुंबई, सौराष्ट्र आणि बडोदा क्रिकेट संघटनांचा पश्‍चिम विभागात समावेश होतो. या विभागाच्यावतीने हैदराबादलाला खेळताना त्याच्या वाट्याला चारपैकी  एकच सामना आला. या एकमेव सामन्यात त्याने ९ षटकांत ३ बळी टिपले; आणि निवड समितीचे प्रमुख व्यकंटेश प्रसाद यांनी त्याची निवड केली. याच चमुतून पुढच्या १९ वर्षांखालील विश्‍वचषकासाठीच्या संघाची निवड होत असते. बंगळूरमधील शिबिरात यतीन  मंगवाणी आणि रणजित असे दोघेच महाराष्ट्राचे खेळाडू असतील. या शिबिरासाठी ज्येष्ठ क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि झहीरखान मार्गदर्शक असतील. पुढच्या दोन वर्षांत तो आयपीएल, रणजित खेळेल अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. त्याला एमआरएफ चेस फाऊंडेशनचे प्रसाद कानडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

त्याआधी सांगलीत विष्णू शिंदे, राजू निपाणीकर, राकेश उबाळे, दिनेश उबाळे यांच्याकडे त्याने क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले. सांगलीवाडीचे अशोक पवार यांनी या तिघा बंधूसाठी त्यांचे सांगलीवाडीतील खासगी इनडोअर स्टेडियमच्या चाव्याच त्यांच्या हाती दिल्या आहेत. 

वडील आणि काकांचे परिश्रम...
इयत्ता नववीत शिकणाऱ्या रणजितच्या आजवरच्या प्रवासात त्याचे वडील अशोक आणि काका वसंत यांनी केलेला त्याग खूप मोठा आहे. या कुटुंबाने या तीनही मुलांच्या क्रिकेट करिअरसाठी सांगलीतील आपला व्यवसाय सोडून पुण्याला स्थलांतर केले. सध्या ते  तिघेही पुना क्‍लबचे खेळाडू आहेत. चौगुले कुटुंबाने या मुलांसाठी सर्वस्व पणाला लावले आहे.

खास क्रिकेटसाठी हवे क्रीडांगण
सांगलीत क्रिकेटसाठी प्रशिक्षक चांगले आहेत; पण यासाठी खास क्रीडांगणच नाही अशी अवस्था आहे. एकाच शिवाजी क्रीडांगणावर खूप ताण पडतो. अशा परिस्थितीत प्रशिक्षणासाठी पुण्याकडे धाव घ्यावी लागते. असे असूनही येथून खेळाडू चमकू लागले आहेत. सांगलीकडून यापूर्वी तरणजितसिंग धिल्लाँची रणजी संघात निवड झाली होती. तसेच राकेश उबाळे व गणेश कुकडे हे रणजीसंघात राखीव खेळडू होते. तर सुमित चव्हाण याने रणजीसंघात वनडे आणि टी-२० खेळला आहे.

loading image