भारत दौऱ्यासाठी साकलेन इंग्लंडचा फिरकी सल्लागार

पीटीआय
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

1999 च्या पाकिस्तानच्या भारत दौऱ्यात साकलेन कमालीचा प्रभावी ठरला होता. त्यामुळे पाकिस्तानने चेन्नई आणि कोलकाता येथील कसोटी सामने जिंकले होते. माझा अनुभव इंग्लंड संघाच्या कामी येईल, असाही विश्‍वास त्याने व्यक्त केला.

कराची : आगामी भारत दौऱ्यासाठी इंग्लंडने पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्‍ताकला फिरकी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. मी भारतात येण्यामुळे कोणती अडचण निर्माण होणार नाही, असा विश्‍वास सकलेनने व्यक्त केला.

इंग्लंडचा संघ भारतात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना 9 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. इंग्लंडचा संघ बांगलादेशमध्ये सध्या मालिका खेळत असून दुसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरला संपत आहे. त्यानंतर 2 तारखेला ते भारतात येतील; पण सकलेन 1 तारखेलाच भारतात येणार आहे. त्यानंतर तो 15 दिवस इंग्लंड संघाबरोबर राहणार आहे.

फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टयांवर आपल्या फिरकी गोलंदाजांनी कशी गोलंदाजी करायची, याचा सल्ला साकलेन त्यांना देईल. भारतातील खेळपट्टया फिरकीस साह्य करणाऱ्या असतात. त्यामुळे इंग्लिश गोलंदाजांना टिप्स देण्यास मी इच्छुक आहे. तसेच त्यांच्या फलंदाजांनाही फिरकी गोलंदाजी कशी खेळायची, याचेही धडे मी देणार आहे; पण हे आव्हान सोपे नसेल, असे साकलेनने सांगितले.

1999 च्या पाकिस्तानच्या भारत दौऱ्यात साकलेन कमालीचा प्रभावी ठरला होता. त्यामुळे पाकिस्तानने चेन्नई आणि कोलकाता येथील कसोटी सामने जिंकले होते. माझा अनुभव इंग्लंड संघाच्या कामी येईल, असाही विश्‍वास त्याने व्यक्त केला.

साकलेन हा सध्या ब्रिटनचा नागरिक आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत सुरू असलेल्या तणावाचा माझा भारतात येण्यावर काही परिणाम होणार नाही; तसेच कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया येणार नाही, असे मत साकलेनने मांडले.

"दुसरा' या चेंडूचा शिल्पकार असलेल्या साकलेनने या अगोदर वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड संघाचेही फिरकी मार्गदर्शक म्हणून राहिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने कधीही त्याच्या सेवेचा उपयोग करून घेतलेला नाही.

Web Title: Saqlain Mushtaq to coach England for India Tour