गांगुलीच्या 'ड्रीम टीम'मध्ये धोनीऐवजी रिषभ पंत!

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

रिषभ पंतकडे 'धोनीचा वारसदार' म्हणूनच पाहिले जात आहे. एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील भारतीय संघाचे नेतृत्व धोनीने सोडल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली.

मुंबई : 'आयपीएल'च्या फॅंटसी लीगने सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह माजी क्रिकेटपटूंचेही लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने काल (सोमवार) त्याच्या 'ड्रीम टीम'ची घोषणा केली. 

गांगुलीने या 'ड्रीम टीम'साठी खेळाडू निवडताना यंदाच्या 'आयपीएल'मधील आतापर्यंतच्या कामगिरीचा आधार घेतला आहे. यात बड्या खेळाडूंसह सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी करणाऱ्या तरुण खेळाडूंचीही त्याने निवड केली आहे. यात विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथसारख्या बड्या खेळाडूंचा समावेश तर आहेच; शिवाय मनीष पांडे आणि नितीश राणासारख्या तरुण खेळाडूंनाही त्याने निवडले आहे. 

ही आहे सौरभ गांगुलीची 'ड्रीम टीम' : 

 1. विराट कोहली (बंगळूर) 
 2. गौतम गंभीर (कोलकाता) 
 3. स्टीव्ह स्मिथ (पुणे) 
 4. एबी डिव्हिलर्स (बंगळूर) 
 5. नितीश राणा (मुंबई) 
 6. मनीष पांडे (कोलकाता) 
 7. रिषभ पंत (दिल्ली) 
 8. सुनील नारायण (कोलकाता) 
 9. अमित मिश्रा (दिल्ली) 
 10. भुवनेश्‍वर कुमार (हैदराबाद) 
 11. ख्रिस मॉरिस (दिल्ली) 

विशेष म्हणजे, या संघातील यष्टिरक्षक म्हणून गांगुलीने तरुण रिषभ पंतची निवड केली आहे. महेंद्रसिंह धोनीसारखा दिग्गज यष्टिरक्षक यंदाच्या 'आयपीएल'मध्ये खेळत असूनही गांगुलीने पंतला प्राधान्य दिले. अर्थात, धोनीचे यष्टिरक्षण नेहमीप्रमाणेच उच्च दर्जाचे असले, तरीही यंदाच्या स्पर्धेत तो दोनच सामन्यात फलंदाजीत कमाल करू शकला आहे. 

रिषभ पंतकडे 'धोनीचा वारसदार' म्हणूनच पाहिले जात आहे. एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील भारतीय संघाचे नेतृत्व धोनीने सोडल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी वृद्धिमान साहाला संघात स्थान मिळाले. मात्र, साहाचे वय पाहता भारतीय क्रिकेट संघ दीर्घकालीन नियोजनात रिषभ पंतकडे समर्थ पर्याय म्हणून पाहत आहे. 

Web Title: Saurav Ganguly announces his IPL Fantasy league team