वरिष्ठ संघातील वातावरण युवकांना प्रोत्साहन देणारे

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

प्रशिक्षण म्हणजे केवळ खेळाडूंना प्रगल्भ करणे होत नाही;तर त्यांच्याबरोबरीने संघदेखील एकत्रित बांधण्याची जबाबदारी असते. या दोन गोष्टी जुळून आल्या तरच खेळाडूंच्या कारकिर्दीला एक महत्त्व येते.
- राहुल द्रविड, भारतीय युवा संघाचे प्रशिक्षक

नवी दिल्ली : कुमार खेळाडूंकडून चांगली कामगिरी करवून त्यांना वरिष्ठ संघाच्या दारात नेऊन उभे करणारे 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक अनिल कुंबळे यांच्या नियोजनाची स्तुती केली.

"कोहली आणि कुंबळे यांच्यामुळेच भारतीय संघात युवकांना प्रोत्साहित करणारे आणि त्यांना सुरक्षित वाटणारे वातावरण निर्माण झाले आहे,'' असे द्रविड यांनी म्हटले आहे.

युवकांना प्रोत्साहित करण्याचे नियोजन कोहली आणि कुंबळे यांनी राबविल्यामुळेच करुण नायर आणि जयंत यादव यांना दडपणाशिवाय मैदानावर आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवता आली, असे द्रविड यांनी सांगितले. ते म्हणाले, ""भारतीय "अ' संघातून युवा खेळाडू पुढे येत आहेत. यापूर्वीही ते येत होते; पण त्यांना प्रोत्साहित केले जात नव्हते. कोहली आणि कुंबळे यांनी मात्र प्राधान्याने या गोष्टींकडे लक्ष पुरवले. त्यांच्यामुळेच आज संघातील वातावरण हे युवकांना धीर आणि आत्मविश्‍वास देणारे ठरत आहे.''

"अ' राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स अशा संघांतून खेळताना नायरला द्रविड यांचे मार्गदर्शन मिळाले. ते म्हणाले, ""कारकिर्दीमधील पहिलेच शतक त्रिशतकात रूपांतरित करायचे ही सोपी गोष्ट नाही. त्याने आपल्या खेळातून केवळ क्षमताच दाखवून दिली नाही; तर आपण धावांसाठी किती भुकेलेलो आहोत, हे देखील दाखवून दिले. चांगला क्रिकेटपटू घडण्यासाठी या गोष्टी खूप आवश्‍यक आहेत. युवा खेळाडू पुढे येत आहेत याचेच मला विजयापेक्षा अधिक समाधान आहे.''

कुमार खेळाडूंचा संघ सांभाळताना केवळ विजय हेच उद्दिष्ट ठवले नाही; तर कामगिरीत सातत्य कसे राखता येईल, यावर आम्ही भर दिला असल्याचे द्रविड म्हणाले. युवा खेळाडू हे भारताचा उद्याचा चेहरा आहे. त्यांना योग्य वेळी संधी मिळायला हवी, असा आग्रह धरताना द्रविड म्हणाले, ""कुमार खेळाडूंना योग्य वेळीच संधी मिळायलाच हवी. यासाठी आम्ही सातत्याने वरिष्ठ संघ व्यवस्थापनेच्या सतत संपर्कात असतो. त्यांना जर अष्टपैलू खेळाडूची गरज असेल, तर आम्ही युवा संघात अधिक अष्टपैलू खेळाडूंना संधी देतो. कुमार वयातच त्यांना प्रोत्साहन मिळाले, तर त्यांचा आत्मविश्‍वास दुणावतो.''

Web Title: senior team is motivating- rahul dravid