बिनशर्त माफीशिवाय पाकशी मालिका नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

संतप्त हॉकी इंडियाची सडेतोड भूमिका

मुंबई/नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वीच्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील आपल्या खेळाडूंच्या गैरवर्तणुकीचा मुद्दा काढत पाकिस्तानने भारताच्या जुन्या जखमेवर बोट ठेवले. संतापलेल्या हॉकी इंडियाने आता त्या प्रकरणाबद्दल जोपर्यंत लेखी जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट मालिका होणार नाही, असा इशारा दिला.

संतप्त हॉकी इंडियाची सडेतोड भूमिका

मुंबई/नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वीच्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील आपल्या खेळाडूंच्या गैरवर्तणुकीचा मुद्दा काढत पाकिस्तानने भारताच्या जुन्या जखमेवर बोट ठेवले. संतापलेल्या हॉकी इंडियाने आता त्या प्रकरणाबद्दल जोपर्यंत लेखी जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट मालिका होणार नाही, असा इशारा दिला.

गतवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हॉकी इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष नरिंदर बात्रा आणि पाक हॉकी पदाधिकाऱ्यात चर्चा झाली होती. त्या वेळी २०१४ च्या स्पर्धेतील कटू प्रसंग विसरण्याचे ठरले होते. एवढेच नव्हे, तर लखनौ विश्वकरंडक कुमार स्पर्धेपासून पाकला त्यांनी वेळेत सहभागाची औपचारिकता पूर्ण न केल्यामुळे दूर राहावे लागले होते. त्यानंतरही पाक महासंघ सचिवांनी २०१४ च्या संघर्षाचा मुद्दा आणला. त्यामुळे भारताने पाकविरुद्धच्या थेट लढतीत न खेळण्याचे ठरवले आहे. 

२०१४ मध्ये काय घडले होते
उपांत्य लढतीत भारतावर विजय मिळविल्यानंतर पाक खेळाडू टी शर्ट काढून मैदानावर नाचले होते. त्याचबरोबर त्यांनी प्रेक्षकांकडे पाहून आक्षेपार्ह हावभाव केले होते. गैरवर्तणुकीबद्दल पाकच्या चार खेळाडूंवर एका सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.  तेव्हा पाक प्रशिक्षकांनी माफी मागितली होती.

पाकिस्तानचा दावा...
२०१४ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या वेळी पाक खेळाडूंच्या तथाकथित गैरवर्तणुकीबद्दल माफी न मागितल्यानेच भारताने विश्वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेत भारतात प्रवेश नाकारला. आम्ही सहभाग वेळेत निश्‍चित केला नाही, असा त्यांचा दावा आहे. प्रत्यक्षात २०१४ च्या प्रकारामुळेच सहभाग नाकारला गेला. जे काही घडले त्याबद्दल खेद व्यक्त केला होता, तरीही हे प्रकरण संपत नाही. भारतात पुढील वर्षी विश्वकरंडक स्पर्धा आहे, त्यामुळे या प्रश्नावर तोडगा हवा आहे.
- शाहबाज अहमद, पाक महासंघाचे सचिव

भारताचे प्रत्युत्तर
स्पर्धेपूर्वी ६० दिवस अगोदर व्हिसासाठी अर्ज सादर करण्यास सर्वच देशांना सांगितले होते. पाकिस्तान हॉकी महासंघाने ही मुदत पाळली नाही. त्यांना नियमाची वारंवार आठवण करून दिली होती. पाकिस्तान महासंघाने मुदत पाळली नाही, तर त्याबद्दल दोष भारतीय हॉकी महासंघास कसा दिला जातो? स्वतःच्या चुका लपवण्यासाठी पाकिस्तान २०१४ चे प्रकरण उकरून काढत आहे. त्यांच्या खेळाडूंनी केलेले गैरवर्तन सर्वांनीच पाहिले होते.
- आर. पी. सिंग, हॉकी इंडिया कार्यकारिणी सदस्य

Web Title: the series is not unconditional apology pakistan