आता लगान वसूल कराच!

शैलेश नागवेकर
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

‘लगान’ हा शब्द उच्चारला की, आमीरचा चित्रपट डोळ्यासमोर तरळतो. भारतावर राज्य करणारे आणि क्रिकेटचे जन्मदाते

इंग्रज, क्रिकेट यांचा संदर्भ येतो. अर्थात, ‘लगान’ या शब्दाच अर्थ ‘कर’ असा आहे. त्या चित्रपटात आमीरचा संघ जिंकतो आणि कर रद्द होतो. वास्तवतेत विराट कोहलीच्या टीम इंडियाला गेल्या पाच वर्षांतील इंग्लंड संघाकडून झालेल्या पराभवाची परतफेड करायची आहे आणि विजयाची वसूली करायची आहे. यंदा ही नामी संधी आहे. 

‘लगान’ हा शब्द उच्चारला की, आमीरचा चित्रपट डोळ्यासमोर तरळतो. भारतावर राज्य करणारे आणि क्रिकेटचे जन्मदाते

इंग्रज, क्रिकेट यांचा संदर्भ येतो. अर्थात, ‘लगान’ या शब्दाच अर्थ ‘कर’ असा आहे. त्या चित्रपटात आमीरचा संघ जिंकतो आणि कर रद्द होतो. वास्तवतेत विराट कोहलीच्या टीम इंडियाला गेल्या पाच वर्षांतील इंग्लंड संघाकडून झालेल्या पराभवाची परतफेड करायची आहे आणि विजयाची वसूली करायची आहे. यंदा ही नामी संधी आहे. 

महेंद्रसिंग धोनीच्या धुरंधरांनी २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये मिळविलेले अव्वल स्थान आणि आता २०१६ मध्ये कोहलीच्या विराट सेनेने कसोटी क्रिकेटच्या अव्वल स्थानाला घातलेली गवसणी, या दोन्ही घटना गौरवशाली आहेत; पण आता खरी लढाई सुरू होत आहे. किंबहुना, पहिली अग्निपरिक्षा आता द्यायची आहे. इंग्लंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येत आहेत. सलग नऊ कसोटी सामन्यांत विराट सेना किती पाण्यात आहे, हे सिद्ध करणारे ठरणार आहेत. साधारणतः सालानंतरचा इतिहास पाहिला, तर गांगुलीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मोहिमेत टीम इंडियाने भल्याभल्यांना पाणी पाजले. जग जिंकणाऱ्या स्टीव वॉचा विजयी रथ भारतात गांगुलीच्या संघाने रोखला. त्यानंतर जवळपास प्रत्येक देशाला भारतात कसोटी मालिकेतील यश दुरापास्तच ठेवले; परंतु एक संघ असा आहे की, ज्यांना आपण त्यांच्या भूमीतच नव्हे, तर आपल्या अंगणातही पराभूत करू शकलो नाही. तो संघ आहे इंग्लंडचा. इंग्लंड म्हटले की, लगान हा शब्द येतोच. ‘लगान’चा अर्थ कर असा असला, तरी येथे मात्र बदला असा याचा अर्थ आहे. कारण बरेच हिशेब चुकते करायचे आहेत. 

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि त्यानंतर विरेंद्र सेहवाग अशा एकापेक्षा एक सरस खेळाडूंची टीम इंडिया तयार झाली. तेव्हापासून भारत एक पॉवरहाऊस संघ तयार झाला. अपयशाची गणिते बदलू लागली; पण इंग्लंडविरुद्धच्या आकडेवारीवर लक्ष दिले, तर वेगळेच चित्र पुढे येते. 

२०११ मध्ये आपण एकाच वेळी मर्यादित षटकांचे विश्वविजेते होतो. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होतो. त्यानंतर २०१४ पर्यंत म्हणजेच चार वर्षांत इंग्लंड आणि आपल्या संघात १३ कसोटी सामने झाले. त्यामध्ये ९:२ असा स्कोअर आहे. ही लाजिरवाणी आकडेवारी बदलण्याची हीच नामी संधी आहे. थोडक्‍यात, त्यांच्यावर लगान लावण्याची वेळ आली आहे.

...आणि पाय हवेत गेले
खेळाडूंची पिढी बदलत असते किंवा फॉर्म कमी जास्त होत असतो; तेव्हा असे उलटफेर होत असतात. आपल्याला सर्वांत मोठा धक्का बसला तो वर्षभराने मायदेशात. याच इंग्लंडविरुद्धची मालिका आपण १-२ अशी गमावली तेव्हा. जेथे स्टीव वॉचा संघ काहीच करू शकला नाही तेथे अलिस्टर कूकचा इंग्लंड संघ कोणती खिचडी शिजवणार होता? हा गाफिलपणा कदाचित आपल्याला नडला. वास्तविक पाहता चार सामन्यांच्या त्या मालिकेत आपण अहमदाबादमधील पहिला सामना थाटात जिंकला होता; पण नेमके पाय हवेत गेले आणि तेथेच गेम ओव्हर झाला. मुंबई आणि कोलकता येथील सामने आपण गमावले. आघाडी घेऊन मालिका गमावण्याची नामुष्की आली आणि इंग्लंडने भारतात २८ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली. पहिल्या कसोटीत शतकवीर सेहवाग, आपल्या फिरकीची जादू दाखवणारा आर. अश्विन पुढच्या सामन्यात फ्लॉप ठरले आणि इंग्लंडच्या विजयात कोणी जादू केली, तर माँटी पानेसर नावाच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने. मुळात भारतीय वंशाचा हा खेळाडू इंग्लंडसाठी तसा दुय्यमच होता; परंतु त्याने भारतीय खेळपट्ट्यांचा अचूक अभ्यास केला आणि आपल्या गोलंदाजातील वेग वाढवला आणि त्यामध्ये भारताचे प्रतिथयश फलंदाज अडकत गेले. फलंदाजीत कूक आणि केविन पीटरसन हे फलंदाज अश्विन आणि ओझा यांना दादच देत नव्हते. थोडक्‍यात काय, तर परिस्थितीनुसार बदल भारतात यश मिळवून देतो हा साधा सोपा सिद्धांत इंग्लंड संघाने मांडला होता.

पुढे दोन वर्षांनी धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा इंग्लंडमध्ये गेले. मायदेशातील पराभवाची परतफेड केली जाईल, अशी आशा होती; पण तेव्हाही येरे माझ्या मागल्या. चार सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना अनिर्णित राहिल्यावर लॉर्डस्वर ऐतिहासिक विजय मिळवला. १-० अशी आघाडी घेतली. त्या सामन्यात ईशांत शर्माने फारच तुफानी आणि उसळत्या चेंडूंचा मारा करून इंग्लिश फलंदाजांची पळता भूई थोडी केली होती; पण सामन्यात लावलेला जोर त्याला पुढच्या सामन्यासाठी जायबंदी करणारा ठरला आणि इंग्लंडने पुढचे तीन सामने जिंकून मालिका ३-१ अशी खिशात टाकली. ऐन वेळी प्रामुख्याने गोलंदाजांना झालेल्या दुखापती कशा महागात पडतात किंवा लय बिघडवतात, हे यातून सिद्ध होते. २०११च्या इंग्लंड दौऱ्यात झहीर आणि २०१४ मध्ये ईशांत शर्मा यांच्या दुखापतीने घात केला. या दौऱ्यातील अपयश राहुल द्रविडला आणि त्यानंतर लक्ष्मणला निवृत्ती घेण्यास कारणीभूत ठरले.

आता हेच सगळे हिशेब केवळ पराभवाचे नव्हे, तर मानहानीचेही पुरते करायचे आहेत आणि त्यासाठी विराट कोहली-अनिल कुंबळे यांचा अनुभव-कौशल्य निर्णायक ठरणार आहे. आताही आपण कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहोत. धोनीला जे जमले नाही ते विराटला करून दाखवायचे आहे. तोच अलिस्टर कूक पुन्हा खिचडी तयार करायला आला आहे. या वेळी मात्र त्यांच्या संघाचा प्रशिक्षक बदलला आहे. भारतावर ९:२ या त्यांच्या यशात अँडी फ्लॉवर यांचे डावपेच निर्णायक ठरले होते. आता मूळचे दक्षिण आफ्रिकेचे ट्रॅव्हस बेलिस कशी रणनीती आखतात? हे महत्त्वाचे ठरणार आहे. काहीही असले तरी कूकचा अगोदरचा अनुभव कामी येणार आहे आणि त्यासाठी कोहली-कुंबळेची रणनिती कलाटणी देणारी ठरू शकते.

वीरूचे शोले भडकणार
विरेंद्र सेहवाग हा सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. समालोचनात तो फटकेबाजी करतोच; पण ट्विटरवर तो कदाचित सर्वाधिक फॉलोअर झाला असेल. सेहवाग इंग्लंडचे पिअर्स मॉर्नग यांच्यातील ट्विटर वॉर तर सेहवाग-अँडरसन यांच्यापेक्षा जास्त गाजत आहे. ऑलिंपिकमधील भारताची कामगिरी आणि इंग्लंडने मिळवलेले यश यावरून अशी काय टोलेबाजी सुरू आहे की, थांबता थांबत नाही. सेहवाग तर टिचक्‍या मारण्याची एकही संधी सोडत नाही. भारत-इंग्लंड मालिकेत हे ट्विटर वॉर रंगणार यात शंकाच नाही.

अश्विन हुकमी एक्का
भारतासाठी आशेचा किरण असेल तो अश्विन. त्याला सापडलेला सूर आणि वाढलेला आत्मविश्वास हुकमी ठरू शकेल. २०१२ च्या मालिकेत अश्विनची जादू लुप्त झाली होती. आता अश्विन नाणे वाजले की, इंग्लंडचे १२ वाजण्यास फार वेळ लागणार नाही. कारण काही दिवसांपूर्वीच बांगलादेशमध्ये त्यांच्या १९ वर्षीय मेहदी अल हसन या ऑफस्पिनरने इंग्लिश फलंदाजांना नाचवले होते. त्यामुळे त्यांनी भारतात येण्यापूर्वीच फिरकीचा धसका घेतला आहे. अश्विनने सुरुवातीलाच दणका दिला, तर पुढचे काम सोपे होईल; परंतु पुन्हा प्रश्न पाय जमिनीवर ठेवण्याचा कायम राहतोच.

Web Title: Shailesh Nagvekar write about India England test series