कोहलीच्या अनुपस्थितीत 'रॉयल चॅलेंजर्स'चे नेतृत्व शेन वॉटसनकडे 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

बंगळूरचा कर्णधार विराट कोहली याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. त्यामुळे तो 'आयपीएल'मधील सुरवातीचे काही सामने खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले. 

बंगळूर: 'इंडियन प्रीमिअर लीग'च्या (आयपीएल) दहाव्या मोसमाला सुरवात होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाला दुखापतींनी घेरले आहे. त्यामुळे सुरवातीच्या काही सामन्यांसाठी बंगळूरच्या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनकडे सोपविण्यात आले आहे.

बंगळूरचा कर्णधार विराट कोहली याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. त्यामुळे तो 'आयपीएल'मधील सुरवातीचे काही सामने खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले. 

वास्तविक, कोहलीच्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर 'एबी डिव्हिलर्स कर्णधार असेल' असे बंगळूरचे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी जाहीर केले होते. मात्र, डिव्हिलर्सच्या पाठीला दुखापत झाली असल्याने बंगळूरच्या पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. दक्षिण आफ्रिकेतील देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेतील अंतिम सामन्यातही डिव्हिलर्स खेळू शकला नव्हता.

अर्थात, डिव्हिलर्स बंगळूरच्या संघात दाखल झाला आहे आणि संघाच्या सराव सत्रामध्ये त्याने भागही घेतला होता. पण त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी वेळ द्यावा लागेल, असे व्हिटोरी यांनी सांगितले. यामुळे कोहली व डिव्हिलर्सच्या अनुपस्थितीत वॉटसनकडे नेतृत्व सोपविण्यात आले. 

दुसरीकडे, स्पर्धेला सुरवात होण्यापूर्वीच बंगळूरला दुखापतींच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. सोमवारी सराव सत्रादरम्यान 19 वर्षांच्या सर्फराज खानच्या पायाला दुखापत झाली. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले.

या दुखापतीचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नसले, तरीही त्याला यंदाच्या स्पर्धेला मुकावे लागण्याची दाट शक्‍यता आहे. यापूर्वी बंगळूरचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनेही दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

Web Title: Shane Watson to lead RCB in absence of Virat Kohli and AB De Villiers