सहकाऱ्यांच्या विनंतीवरून शशांक मनोहर यांचा राजीनामा मागे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

नियमानुसार पुढील व्यवस्था होईपर्यंत मी या पदावर काम करणार आहे. आयसीसीच्या नव्या कार्यपद्धतीत होणारा बदल सुरळीत करण्यासाठी सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची जबाबदारी मला पार पाडायची आहे.

दुबई : आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांनी या पदावरून दूर होण्याचा निर्णय काही काळासाठी बदलला असून, पुढील अध्यक्ष निवडला जाईपर्यंत या पदावर काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

वैयक्तिक कारणासाठी आयसीसीचे कार्याध्यक्ष सोडत असल्याचे मनोहर यांनी स्पष्ट केले होते; परंतु आयसीसीमधील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत हे पद सांभाळण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत मनोहर यांनी काही काळासाठी आयसीसीचे कार्याध्यक्षपद स्वीकारले आहे. 

या संदर्भात बोलताना मनोहर म्हणाले, ''आयसीसीमधील इतर संचालकांनी दाखवलेल्या विश्‍वासाचा मी आदर करतो. तरीही हे पद सोडण्याचे माझे वैयक्तिक कारण असून, ते कायम आहे. नियमानुसार पुढील व्यवस्था होईपर्यंत मी या पदावर काम करणार आहे. आयसीसीच्या नव्या कार्यपद्धतीत होणारा बदल सुरळीत करण्यासाठी सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची जबाबदारी मला पार पाडायची आहे.'' 

आयसीसीच्या नफ्याच्या टक्केवारीची विभागणी या नव्या रचनेला बीसीसीआयने विरोध केला असल्यामुळे मनोहर यांनी कार्याध्यक्षपद सोडल्याचे बोलले जात होते. आयसीसीच्या पुढील बैठकीत या नव्या मसुद्याला मान्यता दिली जाण्याची शक्‍यता आहे. हा मसुदा मान्य झाला, तर बीसीसीआयच्या आयसीसीकडून मिळणाऱ्या टक्‍क्‍यांत घट होणार आहे. 
या संदर्भात आयसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणारे विक्रम लिमये म्हणतात, की सर्वांचे समाधान होईल अशा प्रकारे हा उत्पत्न टक्केवारीचा मुद्दा सोडवला पाहिजे. मनोहर यांनी आयसीसीचा राजीनामा देण्याच्या अगोदर त्यांच्याबरोबर झालेली आमची बैठक सकारात्मक होती.

Web Title: Shashank Manohar to continue; ICC will find his successor within next few months