World Cup 2019 : शास्त्री, कोहलीला जाब विचारला जाणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर उपांत्य फेरीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली यांनी चाहत्यांच्याबरोबरीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रोषाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर शास्त्री आणि कोहलीसह संपूर्ण सपोर्ट स्टाफकडे या पराभवाची कारणे मागितली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
 

वर्ल्ड कप 2019 :
मुंबई ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर उपांत्य फेरीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली यांनी चाहत्यांच्याबरोबरीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रोषाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर शास्त्री आणि कोहलीसह संपूर्ण सपोर्ट स्टाफकडे या पराभवाची कारणे मागितली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतरही उपांत्य फेरीत 240 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजी न्यूझीलंडच्या स्विंग माऱ्यासमोर ढेपाळली होती. त्यामुळे हा पराभव भारतीयांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मायदेशी परतल्यावर संघ निवड, मधल्या फळीतले अपयश आणि डावपेच आखण्यात आलेले अपयश अशा आणि त्याला जोडून येणाऱ्या असंख्य प्रश्‍नांची सरबत्तीच प्रशिक्षक आणि कर्णधारांवर केली जाणार आहे. 

विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल यांच्याखेरीज एकही फलंदाज आपला स्तर दाखवू शकला नाही. मधल्या फळीत निवड झालेले दोन फलंदाज यांना मूळ संघ निवडताना पहिली पसंती नव्हती. आता संघ हरल्यावर संघ निवडीमधील त्रुटी दिसू लागल्या आहेत. धोनी तंदुरुस्त असताना देखील एकाच वेळी तीन यष्टिरक्षकांना संघात खेळविण्याचा निर्णय या सगळ्यात कळीचा ठरणार असा अंदात बांधला जात आहे. स्पर्धेसाठी दिनेश कार्तिकची निवड राखीव यष्टिरक्षक म्हणून करण्यात आली असून, धोनी जखमी झाला तरच तो खेळेल असे निवड समिती अध्यक्ष एम. एस.के. प्रसाद यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरही तीन यष्टिरक्षक कशासाठी खेळविले? हा आणि असे अनेक प्रश्‍न आता संघ व्यवस्थापनाची वाट बघत आहेत. 

पहिला बळी पडला 
उपांत्य फेरीतील अपयशानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापनात काही तरी बदल होणार याची खात्री होतीच. यात पहिला बळी फिजियो आणि तंदुरुस्ती प्रशिक्षकांचा पडला आहे. उपांत्य फेरीतील पराभवानंतर फिजियो पॅट्रिक फरहात आणि तंदुरुस्ती प्रशिक्षक शंकर बसू यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shastri, Kohli to be asked tough questions by BCCI