शास्त्री-कोहली यांची बीसीसीआय करणार चौकशी 

वृत्तसंस्था
Tuesday, 14 August 2018

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत स्वीकारलेल्या शरणागतीची बीसीसीआयनेही दखल घेतली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी तुमची कोणती व्यूहरचना असणार आहे, असे काही प्रश्‍न बीसीसीआय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीसमोर उपस्थित करणार आहे. 
 

नवी दिल्ली- भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत स्वीकारलेल्या शरणागतीची बीसीसीआयनेही दखल घेतली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी तुमची कोणती व्यूहरचना असणार आहे, असे काही प्रश्‍न बीसीसीआय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीसमोर उपस्थित करणार आहे. 

तिसरा कसोटी सामना येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे आणि या सामन्यादरम्यान पुढील दोन सामन्यांसाठी संघ निवड करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआयकडून करण्यात येणारी विचारणा महत्त्वाची आहे. मालिका जिंकण्यासाठी भारताला आता पुढील तिन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुरेसा सराव करता आला नसल्याची खंत प्रामुख्याने शास्त्री आणि कोहली यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर बीसीसीआयने या इंग्लंड दौऱ्यासाठी प्रथम मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिका घेण्यास इंग्लंडला भाग पाडले. ज्यामुळे भारतीयांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेपूर्वी अधिक काळ सरावाची संधी मिळेल. तरिही कसोटी सामन्यात फलंदाजांनी हाराकिरी केली, असा प्रश्‍न बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. 

इंग्लंड दौऱ्यात आम्ही प्रथम मर्यादित षटकांची मालिका घेतली, तसेच सीनियर खेळाडूंच्या विनंतीवरून भारताचा अ संघ पाठवला. या संघातून मुरली विजय आणि अजिंक्‍य रहाणे यांना खेळण्याची संधी उपलब्ध केली तरिही जर निकालात फरक पडणार नसेल, तर आम्ही प्रश्‍न उपस्थित करू शकतो, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात (0-2, 2014-15), दक्षिण आफ्रिकेत 1-2, 2017-18) या प्रमुख परदेशांत पराभूत झाला आहे आणि आता इंग्लंडमध्ये 0-2 असे पिछाडीवर आहे, अशी आकडेवारी सादर करताना बीसीसीआय फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण यांना समोरही प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे स्पष्ट केले. स्लीपमधील क्षेत्ररक्षणातही गेल्या काही सामन्यांत मिळून 50 झेल सोडण्यात आल्याचीही आकडेवारी मांडताना क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shastri Kohli duo might face BCCI questions for debacle in England