World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाला मोठा झटका; मार्श मायदेशी, मॅक्‍सवेल रुग्णालयात

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

स्पर्धेच्या निर्णायक वळणावर ऑस्ट्रेलियासमोर दुखापतीची चिंता 

वर्ल्ड कप 2019 :
मॅंचेस्टर ः
विश्‍वकरंडक स्पर्धा निर्णायक वळणावर आलेली असताना ऑस्ट्रेलियासमोर खेळाडूंच्या दुखापतींची चिंता वाढली आहे. मधल्या फळीतील फलंदाज शॉन मार्श आधीच उपचारासाठी मायदेशी परतला आहे, पाठोपाठ ग्लेन मॅक्‍सवेलला देखील रुग्णालयाचा रस्ता धरावा लागला आहे. 

गुणतक्‍त्यात ऑस्ट्रेलिया आघाडीवर असले तरी एकापाठोपाठ दोन खेळाडू जखमी होणे हे नक्कीच चांगले नाही. विजेतेपदाचा षटकार लगावण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ उत्सुक असतानाच या दुखापतीमुळे त्यांच्या तयारीवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन जखमी खेळाडूंपैकी एक मायदेशी परतला असून, दुसरा रुग्णालयात गेला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूवी4 सराव करताना ओल्ड ट्रॅफर्डवरील नेट्‌समध्ये पॅट कमिन्सचा चेंडू हातावर आदळून मार्श जखमी झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिशेल स्टार्कचा चेंडू असाच हाताव लागून मॅक्‍सवेल जखमी झाला आहे. मार्शच्या मनगटाला फ्रॅक्‍टर असून त्याला शस्त्रक्रीया करण्यासाटी तातडीने मायदेशी पाठविण्यात आले आहे. त्याची जागा पीटर हॅंड्‌सकोम्ब घेईल. आयसीसीने या बदलास मान्यता दिली आहे. मॅक्‍सवेलच्या दुखापतीचे स्वरुपाविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. 

ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी हॅंड्‌सकोम्बच्या निवडीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले,""पीटर हा संगात हवा हवासा असणारा खेळाडू आहे. मधल्या फळीत तो चांगली फलंदाजी करतो. स्पर्धेपूर्वीच्या भारत आणि अमिरातीच्या दौऱ्यात त्याची कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे त्याचा आम्हाला फायदाच होईल.'' 

दरम्यान, सरावानंतर मैदान सोडताना लॅंगर यांनीच मॅक्‍सवेलची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले आहे. शनिवारच्या सामन्यापर्यंत तो पूर्ण तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना लॅंगर यांनी उद्या सकाळी तंदुरुस्ती चाचणीनंतरच त्याच्या समावेशाविषयी निर्णय घेतला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shaun Marsh out of World Cup, Glenn Maxwell hurt