भारतीय संघात स्थान मिळविण्यास उत्सुक : धवन

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

माझ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची क्षमता आणि गुणवत्ता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी हुकल्याबद्दल मी निराश आहे. मला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचे आहे.

हैदराबाद : सलामीचा फलंदाज शिखर धवन याने भारतीय संघात पुन्हा एकदा स्थान मिळविण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. देशांतर्गत स्पर्धेत यश मिळविल्यावर आता आयपीएलमध्ये सातत्य राखून आपण भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिखर धवनने सांगितले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2012-13 मध्ये पदार्पणात वेगवान कसोटी शतक झळकाविणारा धवन ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यासाठी मात्र भारतीय संघात नव्हता. तो म्हणाला, ''माझ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची क्षमता आणि गुणवत्ता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी हुकल्याबद्दल मी निराश आहे. मला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. त्या दृष्टीने कठोर मेहनतदेखील घेत आहे.'' 

भारतीय संघातून वगळल्यानंतर माझ्यासाठी प्रत्येक स्पर्धा, सामना महत्त्वाचा असल्याचे सांगून धवन म्हणाला, ''भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी आता स्पर्धा खूप वाढली आहे. कामगिरीत सातत्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच माझ्यासाठी आता प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. आयपीएलमध्ये माझी कामगिरी अशीच सातत्यपूर्ण होईल, असा मला विश्‍वास आहे.'' देवधर करंडक स्पर्धेत खेळल्यानंतर धवन आता 'आयपीएल'मध्ये हैदराबाद संघाकडून खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना बुधवारी (ता. 5) बंगळूर संघाशी होणार आहे. धवन म्हणाला,''पहिला सामना खेळण्यास मी उत्सुक आहे. निराशा विसरून मी अत्यंत संयमाने खेळ करण्याचा प्रयत्न करेन. कोहलीच्या गैरहजेरीत आम्ही या मोसमाची विजयी सुरवात करण्याची संधी आम्ही निश्‍चित साधू.'' 

कोहली संघात नसला, तरी त्यांच्याकडे ख्रिस गेल, एबी डिव्हिलर्स, शेन वॉटसन असे दिग्गज खेळाडू असून, आम्ही त्यांना रोखण्याचे परिपूर्ण नियोजन करूनच मैदानात उतरू, असेही त्याने सांगितले.

Web Title: Shikhar Dhawan confident of coming back in Team India