शिखर धवन जखमी; गंभीरला संधी मिळणार?

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

धवनच्या जागी संघात कुणाला संधी मिळणार, याविषयी अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र गंभीरचा अनुभव पाहता आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकलेली असल्यामुळे त्यालाच या संघात स्थान मिळण्याची दाट शक्‍यता आहे.

कोलकाता: हाताला झालेल्या फ्रॅक्‍चरमुळे सलामीवीर शिखर धवनला 15 दिवसांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. के. एल. राहुलही जखमी असल्यामुळे अनुभवी सलामीवीर गौतम गंभीरचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची दाट शक्‍यता आहे. 

पहिल्या कसोटीमध्ये के. एल. राहुल आणि मुरली विजय अशी भारताची सलामीची जोडी होती. या सामन्यामध्ये राहुल जखमी झाला. त्यामुळे त्याच्या जागी गौतम गंभीरला 15 जणांच्या संघामध्ये संधी मिळाली. राहुलच्या जागी कोलकाता कसोटीत अंतिम संघात स्थान मिळेल, अशी गंभीरला आशा होती. मात्र गंभीरऐवजी धवनला पसंती मिळाली. 

कोलकाता कसोटीत धवन पहिल्या डावात फक्त एक धाव करून बाद झाला. तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचे वेगवान चेंडू दोन वेळा धवनच्या अंगठ्यावर आदळले. या डावात धवन 17 धावा करून बाद झाला. 

गौतम गंभीर गेली दोन वर्षे भारतीय संघातून बाहेर आहे. यंदाच्या दुलीप करंडक स्पर्धेत गंभीरची कामगिरी चांगली झाली होती. त्याने पाच डावांमध्ये चार अर्धशतकांसह 356 धावा केल्या होत्या. यामुळे राहुल जखमी झाल्यानंतर गंभीरची निवड झाली. धवनच्या जागी संघात कुणाला संधी मिळणार, याविषयी अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र गंभीरचा अनुभव पाहता आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकलेली असल्यामुळे त्यालाच या संघात स्थान मिळण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: With Shikhar Dhawan injured, Gautam Gambhir may get a chance in third test