श्रेयस अय्यरचा द्विशतकी तडाखा

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

 

मुंबई - सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला मुंबईचा हिसका दाखवणाऱ्या श्रेयस अय्यरने आज द्विशतकी तडाखा दिला. तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी ज्या फिरकी गोलंदाजांसह ऑस्ट्रेलियाचा संघ भारताशी दोनहात करणार आहे त्यांना श्रेयसने शरण आणले.

 

मुंबई - सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला मुंबईचा हिसका दाखवणाऱ्या श्रेयस अय्यरने आज द्विशतकी तडाखा दिला. तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी ज्या फिरकी गोलंदाजांसह ऑस्ट्रेलियाचा संघ भारताशी दोनहात करणार आहे त्यांना श्रेयसने शरण आणले.

ब्रेबॉर्न स्टेडियमवरील या सामन्यात श्रेयसने 210 चेंडूंत नाबाद 202 धावांची खेळी करून आपला ठसा उमटवला. या खेळीत त्याने 27 चौकार आणि सात षटकार मारले. ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज नॅथन लीयॉन आणि स्टीव ओकिफे यांनी धावा देण्याचे शतक पार केले. या दोघांनी अनुक्रमे चार आणि तीन बळी मिळवले खरे; परंतु त्यासाठी साडेपाच आणि सव्वाचार धावांच्या सरासरीने धावा बहाल केल्या.
दुसऱ्या दिवसअखेरीस 85 धावांवर नाबाद राहिलेल्या श्रेयसने आज अवघ्या 10 मिनिटांत उरलेल्या 15 धावा करून आपले शतक पूर्ण केले. त्याने कृष्णाप्पा गौथमसह सातव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. श्रेयसची ही नववी प्रथम श्रेणी क्रिकेटमधली शतकी खेळी आहे. गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातही त्याने शतक झळकावले होते.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना पुण्यात 23 तारखेपासून सुरू होत आहे. त्याअगोदर लियॉन आणि ओकिफे यांचा आत्मविश्‍वास खच्ची करण्याचे काम श्रेयसने पार पाडले. क्‍लब क्रिकेटच्या फिरकी गोलंदाजांवर हल्ला करावा अशा थाटात त्याने आणि गौथम यांनी हल्ला चढवला. गौथमनेही 68 धावांत 10 चौकार आणि चार षटकारांसह 74 धावांची खेळी केली.

श्रेयसचे हे प्रथम श्रेणीतील दुसरे द्विशतक आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने वानखेडेवर पंजाबविरुद्धच्या रणजी सामन्यात 200 धावा केल्या होत्या. आज 85 ते 100 ही मजल त्याने वेगवान गोलंदाज जॅकसन बर्डवर चौकारांची बरसात करून गाठली. त्याने 184 ते 202 ही मजल ओकिफला एका षटकात चार चौकार मारून पार केली, यावरून श्रेयसचा झंझावात लक्षात येतो.

भारत "अ' संघाचा डाव 403 धावांत संपुष्टात आल्यावर फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सामना अनिर्णित राखला जाईपर्यंतच्या 36 षटकांत पुरेसा सराव करता आला नाही. डेव्हिड वॉर्नर, रेनशॉ आणि ग्लेन मॅक्‍सेवल बाद झाले. खेळ थांबविण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 110 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया, पहिला डाव ः 7 बाद 469 आणि दुसरा डाव ः 4 बाद 110 (वॉर्नर 36, पंड्या 5-1-30-1, दिंडा 8-2-18-1).
भारत "अ' पहिला डाव ः 403 (श्रेयस अय्यर 202 -210 चेंडू, 27 चौकार, 7 षटकार, कृष्णाप्पा गौथम 74 -68 चेंड, 10 चौकार, 4 षटकार, नॅथन लियॉन 4-162, स्टिव्ह ओकिफे 3-101).

Web Title: Shreyas Iyer hits double ton