स्टिंग ऑपरेशनचे "शुक्‍लकाष्ट' 

वृत्तसंस्था
Friday, 20 July 2018

उत्तर प्रदेश संघातील निवडीसाठी लाच मागितल्याचे "स्टिंग ऑपरेशन'मुळे उघडकीस आल्याने "आयपीएल'चे चेअरमन राजीव शुक्‍ला यांच्या स्वीय कार्यकारी सचिवाला राजीनामा देण्यास "बीसीसीआय'ने भाग पाडले. 
 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश संघातील निवडीसाठी लाच मागितल्याचे "स्टिंग ऑपरेशन'मुळे उघडकीस आल्याने "आयपीएल'चे चेअरमन राजीव शुक्‍ला यांच्या स्वीय कार्यकारी सचिवाला राजीनामा देण्यास "बीसीसीआय'ने भाग पाडले. 

अक्रम सैफी असे त्याचे नाव आहे. एका हिंदी वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने क्रिकेटपटू राहुल शर्मा याच्याशी दूरध्वनीवर बोलताना रोख रक्कम आणि अन्य स्वरूपात लाच मागितली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत "बीसीसीआय'ने सैफीला निलंबित केले आहे. शुक्‍ला हे उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (यूपीसीए) संचालकही आहेत. "बीसीसीआय'च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, की सैफीने राजीनामा दिला आहे. आम्ही शुक्‍ला यांना मत विचारले असता त्यांनी तो तातडीने स्वीकारावा, असे सांगितले. आम्ही सैफीकडून स्पष्टीकरण मागविले आहे. मंडळाच्या 32व्या नियमानुसार चौकशी आयुक्तांची नियुक्ती झाल्यावर ते तपासणी करतील. "यूपीसीए'शी त्यांच्याशी संबंधित काही मुद्दे असतील, तर ते नियमानुसार हाताळेल.

या नियमानुसार याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष सी. के. खन्ना चौकशी आयुक्त नेमतील. त्यांना 15 दिवसांत अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. अहवाल "बीसीसीआय' शिस्तपालन समितीला पाठविण्यात येईल. 

टेप मागविले 
मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले, की आम्ही संबंधित वाहिनीकडून ध्वनिफिती मागविल्या आहेत. आम्ही संपूर्ण चौकशी करू. संबंधितांशी बोलणे होईपर्यंत काहीही भाष्य करणे अवघड आहे. 

सैफीचा इन्कार 
सैफीने बोगस प्रमाणपणे दिल्याचा आरोपही राहुलने केला आहे. तो भारत किंवा राज्य संघाकडून खेळलेला नाही. सैफीने सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. 

"यूपीसीए'चाही इन्कार 
"यूपीसीए'चे चिटणीस युधवीर सिंह यांनी संघनिवडीतील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, की आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ. आमची संघनिवड प्रक्रिया पारदर्शक आहे. सैफी व राहुल यांच्यातील संभाषण त्या दोघांचा वैयक्तिक विषय असल्याने मी भाष्य करणार नाही. मी राहुलविषयी माहिती घेतली. तो कधीच संभाव्य संघात नव्हता. त्यामुळे तो विश्‍वासार्ह नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shukla cricket news sting operation