हार्दिक पंड्याचे शतक; श्रीलंकेचा पहिला डाव गडगडला

Sunday, 13 August 2017

दुसऱ्या दिवशी खेळ चालू झाल्यावर वृद्धिमान साहाला लवकर बाद करण्यात फर्नांडोला यश आले. भारतीय संघाचा पहिला डाव लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न श्रीलंकेच्या गोलंदाजांनी करण्यास सुरवात केली. कुलदीप यादवने हार्दिक पंड्याला साथ दिली तिथेच पहिल्या डावाला कलाटणी मिळू लागली. 26 धावा करताना कुलदीप यादवने 20 षटके खेळपट्टीवर तग धरला. संदकनने कुलदीप पाठोपाठ शमीला बाद केले. एव्हाना हार्दिक पंड्याचे अर्धशतक 61 चेंडूत पूर्ण झाले होते.

पल्लीकल : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला कमी धावांमधे रोखण्याचे श्रीलंकन गोलंदाजांचे स्वप्न हार्दिक पंड्याने एक हाती उधळून लावले. 7 चौकार आणि 7 षटकारांसह पंड्याने शतक ठोकून भारताला 487 धावांची मजल गाठून दिली. 122 षटकांच्या क्षेत्ररक्षणाची थकावट आणि भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा याच्या संगमाने श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावात संपला. क़ुलदीप यादवने चार फलंदाजांना बाद केले. 352 धावांच्या आघाडीमुळे विराट कोहलीने श्रीलंकेला फॉलोऑन दिला.

दुसऱ्या दिवशी खेळ चालू झाल्यावर वृद्धिमान साहाला लवकर बाद करण्यात फर्नांडोला यश आले. भारतीय संघाचा पहिला डाव लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न श्रीलंकेच्या गोलंदाजांनी करण्यास सुरवात केली. कुलदीप यादवने हार्दिक पंड्याला साथ दिली तिथेच पहिल्या डावाला कलाटणी मिळू लागली. 26 धावा करताना कुलदीप यादवने 20 षटके खेळपट्टीवर तग धरला. संदकनने कुलदीप पाठोपाठ शमीला बाद केले. एव्हाना हार्दिक पंड्याचे अर्धशतक 61 चेंडूत पूर्ण झाले होते.

शेवटचा फलंदाज आला म्हणल्यावर पंड्याने मोठे फटके मारून धावा वाढवायचा विचार पक्का करताना षटकाच्या पहिल्या चार चेंडूंवर एकेरी धाव घेण्याचे टाळले. सर्वच्या सर्व 9 खेळाडू सीमारेषेवर ठेवूनही पंड्याला मोठे फटके मारण्यापासून श्रीलंकन गोलंदाज रोखू शकले नाहीत. उमेश यादव बरोबर 50 धावांची भागीदारी झाली ज्यात उमेश यादवच्या 2 धावांचे तर पंड्याच्या 47 धावांचे योगदान होते. 50 ते 100 धावांची मजल 25 चेंडूत पंड्याने पूर्ण केली तेव्हा 6 षटकार आणि 3 चौकारांची बरसात केली. डावखुऱ्या मंदगती गोलंदाज पुष्पकुमारच्या एका षटकात पंड्याने 4-4-6-6-6-0 असा जणू स्थानिक फोन नंबर लिहून देताना 26 धावा कुटल्या. वेगवान गोलंदाजाला ऑन ड्राईव्हचा चौकार मारून हार्दिक पंड्याने कसोटी जीवनातील पहिले शतक फक्त 86 चेंडूत पूर्ण केले तेव्हा भारतीय खेळाडूंनी उभे राहून टाळ्या वाजवून हातवारे करून पंड्याला मानवंदना दिली. उपहारानंतर भारताचा डाव 487 धावांवर संपला जेव्हा संदकनने पंड्याची 108 धावांची घणाघाती खेळी संपवली. संदकनने 36 षटके मारा करून 5 फलंदाजांना बाद करायची करामत केली.

122 षटकांची थकवणारी फिल्डींग करून श्रीलंकन संघ फलंदाजीला उतरला तेव्हा सुरुवातीपासून त्यांना धक्के बसले. मोहंमद शमीने फारच सुंदर वेगवान मारा केला. दमदार शैलीने गोलंदाजी करणाऱ्या शमीचा चेंडू दरवेळी अचूक शिवणीवर पडून स्वींग होत असल्याने दोनही सलामीवीर शमीला बाद झाले. उपुल थरंगा आणि करुणारत्ने दोघेही शमीच्या गोलंदाजीवर सहाकडे झेल देऊन बाद झाले. चांगली फलंदाजी करणारा आक्रमक फलंदाज मेंडीस धावबाद झाला आणि लगेचच अनुभवी अँजेलो मॅथ्यूज हार्दिक पंड्याला पायचित झाला.

कप्तान चंडीमलला डिकवेलाने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून श्रीलंकन संघाच्या धावांचे शतक फलकावर लावले. अचानक डिकवेलाने कुलदीप यादवला उगाचच पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचे दु:साहस केले. सतर्क सहाने त्याला झटक्‍यात स्टंप केले. कप्तान चंडीमल 48 धावांवर अश्‍विनला बाद झाल्यावर श्रीलंकन प्रतिकार संपल्यात जमा झाला. कुलदीप यादव आणि अश्‍विनने मिळून श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांमधे गुंडाळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SLvIND India (487) lead by 332 runs, enforce follow-on vs Sri Lanka 135 all out