पहिला वार आफ्रिकेचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

कांगारू १७७ धावांनी गारद

पर्थ - क्रिकेट जगतामधील बहुचर्चित कसोटी मालिकेत पहिला वार दक्षिण आफ्रिकेने केला आहे. कांगारू मायदेशातील मालिकेत पहिल्या कसोटीत १७७ धावांनी गारद झाले. उदयोन्मुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने पाच विकेट घेत कांगारूंचा निम्मा संघ गारद केला. ‘सामनावीर’ बहुमान त्यानेच पटकावला. आफ्रिकेने तीन कसोटींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटी जिंकण्याचे आव्हान कांगारूंसमोर आहे.

कांगारू १७७ धावांनी गारद

पर्थ - क्रिकेट जगतामधील बहुचर्चित कसोटी मालिकेत पहिला वार दक्षिण आफ्रिकेने केला आहे. कांगारू मायदेशातील मालिकेत पहिल्या कसोटीत १७७ धावांनी गारद झाले. उदयोन्मुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने पाच विकेट घेत कांगारूंचा निम्मा संघ गारद केला. ‘सामनावीर’ बहुमान त्यानेच पटकावला. आफ्रिकेने तीन कसोटींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटी जिंकण्याचे आव्हान कांगारूंसमोर आहे.

कांगारूंसमोर ५३९ धावांचे आव्हान होते. चौथ्या दिवसाअखेर त्यांची ४ बाद १६९ अशी अवस्था झाली होती. आज त्यांचा डाव ३६१ धावांत संपला. प्रमुख वेगवान गोलंदाज डेल स्टेन जायबंदी झाल्यानंतर आफ्रिकेने कांगारूंना पहिल्या डावात केवळ दोन धावांची आघाडी मिळू दिली. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांनी विलक्षण जिद्दीने मारा केला.

पदार्पण करणारा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने नेथन लायन याला पायचीत करून सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले. यष्टिरक्षक-फलंदाज पीटर नेव्हील ६० धावांवर नाबाद राहिला.

वास्तविक ४ बाद १६९ वरून कांगारूंना कसोटी अनिर्णित राखण्याची संधी होती; पण तीन विकेट घेत त्यांचा पाठलाग बिघडविलेल्या रबाडा याने पाहुण्या संघाचा विजय सुकर केला. २१ वर्षांच्या या गोलंदाजाने कारकिर्दीत चौथ्यांदा ‘पाच विकेट’ची कामगिरी केली. इतक्‍या कमी वयात अशी कामगिरी करणारा तो आफ्रिकेचा पहिलाच गोलंदाज ठरला.

अखेरच्या दिवशी रबाडानेच आक्रमण सुरू केले. त्याचा यॉर्कर मिशेल मार्शच्या पॅडवर आदळला. पंच आलिम दर यांनी नाबाद असल्याचा कौल दिला; पण आफ्रिकेने ‘रिव्ह्यू’ घेतला. त्यात मात्र मार्श बाद असल्याचा कौल मिळाला. ख्वाजा-मार्श यांनी ५० धावांची भर घातली. ख्वाजाने एकाकी झुंज दिली; पण त्याचे शतक तीन धावांनी हुकले. ड्युमिनीने हा मोलाचा बळी घेतला. त्याआधी ख्वाजा बावूमाच्या नोबॉलमुळे पायचीत होता होता वाचला होता. 

रबाडाने मग आणखी एका वेगवान यॉर्करवर मिशेल स्टार्कला पायचीत केले. रबाडाने काल शॉन मार्श, स्टीव स्मिथ आणि ॲडम व्होजेस हे मोहरे गारद केले होते.

आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने ड्युमिनी व बावूमा या ‘पार्ट टाइम’ गोलंदाजांना चेंडू देणे फायद्याचे ठरले. वाबूमाने हेझलवूडला बाद केले. हेझलवूड-नेव्हील यांनी नवव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली होती. अखेरचा फलंदाज लायनने २६ मिनिटे व २२ चेंडू तग धरली; पण महाराजने त्याला पायचीत केले.

दृष्टिक्षेपात

  • मायदेशातील मोसमात ऑस्ट्रेलियाने १९८८ नंतर प्रथमच पहिली कसोटी गमावली
  • तेव्हा ब्रिस्बेनला वेस्ट इंडीजविरुद्ध पराभव
  • तेव्हापासून २१ विजय व सहा अनिर्णित अशी मोसमातील पहिल्या कसोटीतील कामगिरी
  • ऑस्ट्रेलिया सलग चौथ्या कसोटी सामन्यात पराभूत
  • यापूर्वी जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यात तिन्ही कसोटींत हार
  • या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया मायदेशात सलग १८ कसोटींमध्ये अपराजित
  • या कालावधीत १४ विजय व चार अनिर्णित अशी कामगिरी
  • यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच पर्थला २०१२-१३च्या मोसमात पराभव
  • दुसरी कसोटी १२ नोव्हेंबरपासून होबार्टला

प्रिटोरीयस बदली खेळाडू

डेल स्टेन जायबंदी झाल्यामुळे ड्‌वेन प्रिटोरीयस याला बदली खेळाडू म्हणून पाचारण करण्यात आले आहे. हायवेल्ड लायन्सतर्फे त्याने फलंदाजीसह गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली आहे. प्रिटोरीयसने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही. तो तीन वन-डे खेळला आहे. अलीकडेच आयर्लंडविरुद्ध त्याने पदार्पण केले. त्याने दोन विकेट आणि एकाच इनिंगमध्ये १५ धावा अशी कामगिरी केली आहे. आतापर्यंत प्रथमश्रेणी कारकिर्दीत ३६ सामन्यांत १९६३ धावा आणि ११५ विकेट अशी कामगिरी केली आहे. सध्या सुरू असलेल्या सनफॉईल मालिकेत त्याने ८७, ८०, ९६, २८ व ७२ अशा धावा केल्या आहेत.

धावफलक
दक्षिण आफ्रिका - पहिला डाव - २४२
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - २४४
दक्षिण आफ्रिका - दुसरा डाव - ८ बाद ५४० घोषित
ऑस्ट्रेलिया - दुसरा डाव - शॉन मार्श झे. फाफ गो. रबाडा १५, डेव्हिड वॉर्नर धावचीत ३५, उस्मान ख्वाजा पायचीत गो. ड्युमिनी ९७-१८२ चेंडू, ११ चौकार, ३ षटकार, स्टीव स्मिथ झे. डिकॉक गो. रबाडा ३४, ॲडम व्होजेस झे. डिकॉक गो. रबाडा १, मिशेल मार्श पायचीत गो. रबाडा २६, पीटर नेव्हील नाबाद ६०, मिशेल स्टार्क पायचीत गो. रबाडा १३, पीटर सीड्‌ल पायचीत गो. फिलॅंडर १३, जॉश हेझलवूड झे. एल्गर गो. बावुमा २९, नेथन लायन पायचीत गो. महाराज ८, अवांतर ३०, एकूण ११९.१ षटकांत सर्वबाद ३६१
बाद क्रम - १-५२, २-५२, ३-१४४, ४-१४६, ५-१९६, ६-२४६, ७-२६२, ८-२८०, ९-३४५.

गोलंदाजी - कागिसो रबाडा ३१-६-९२-५, व्हरनॉन फिलॅंडर २२-७-५५-१, जेपी ड्यूमिनी १७-१-५१-१, केशव महाराज ४०.१-१०-९४-१, स्टीफन कुक २-०-१६-०, तेंबा बावुमा ७-१-२९-१

Web Title: south africa & austrolia test cricket match