पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकाच अजिंक्य;ऑस्ट्रेलियाचा पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

दुसऱ्या डावात पाच बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडा याला सामन्याचा मानकरी किताब देण्यात आला. 

पर्थ - पर्थच्या ऐतिहासिक वॅका मैदानावर आज (सोमवार) पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत, दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजिंक्य राहिला. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 177 धावांनी पराभव केला. 

पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 539 धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज अखेरच्या दिवशी 361 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक पीटर नेवीलने गोलंदाजांच्या साथीने केलेल्या प्रतिकार वाखाणण्यासारखा होता. उस्मान ख्वाजा शतक करण्यात अपयशी ठरला. तो 97 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात पाच बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडा याला सामन्याचा मानकरी किताब देण्यात आला. 

त्यापूर्वी चौथ्या दिवशी हुकमी सलामीवीर वॉर्नरला अशक्‍यप्राय चपळतेच्या जोरावर बावूमाने धावचीत केले होते. स्टेनच्या अनुपस्थितीत फिलॅंडर आणि रबाडा यांनी नव्या चेंडूवर मारा करत ऑस्ट्रेलियाची 4 बाद 169 अशी अवस्था केली होती. या धावसंख्येवरून पुढे खेळताना आज मिशेल मार्शला 26 धावांवर बाद करत रबाडाने आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. ख्वाजा शतकाच्या उंबरठ्यावर असताना ड्युमिनीचा शिकार ठरला. यष्टीरक्षक नेवीलने स्टार्क, सिडल, हेझलवूड आणि लिऑनच्या साथीने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना सामना वाचविण्यात यश आले नाही. अखेर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला पर्थच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. 

Web Title: South Africa beat Australia by 177 runs