एबी डिव्हिलर्सच आफ्रिकेचा कर्णधार!

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

तिसरा आणि अखेरचा सामना 24 नोव्हेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरू होईल. या सामन्यात कामगिरी उंचावून 'व्हाईट वॉश'ची नामुष्की टाळण्याचे खडतर आव्हान स्टीव्ह स्मिथ आणि त्याच्या संघासमोर आहे.

होबार्ट : बदली कर्णधार म्हणून फाफ डू प्लेसिसने ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत विजय मिळविण्याचा पराक्रम केला असला, तरीही 'एबी डिव्हिलर्स हाच कर्णधार असेल' असे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या निवड समितीने स्पष्ट केले.

दुखापतीमुळे एबी डिव्हिलर्स गेले पाच महिने संघातून बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फाफ डू प्लेसिसची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत डू प्लेसिसच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व राखले. तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. त्यामुळे डिव्हिलर्सकडून कर्णधारपद डू प्लेसिसकडे येईल, अशी चर्चा होती.

दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीचे अध्यक्ष लिंडा झोंडी म्हणाले, "फाफ डू प्लेसिस हा बदली कर्णधार आहे आणि एबी डिव्हिलर्स हाच नियमित कर्णधार आहे, याबाबत निवड समितीच्या मनात कोणतीही शंका नाही. अजूनही संघाचा नियमित कर्णधार एबी डिव्हिलर्सच आहे.''

येत्या 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका मायदेशात श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेद्वारे एबी डिव्हिलर्स पुनरागमन करेल, अशी आशा झोंडी यांनी व्यक्त केली. 'डिव्हिलर्सच्या तंदुरुस्तीविषयी वैद्यकीय पथक अहवाल देईल. त्यानंतर प्रत्यक्ष सामना खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल. कारण तो पाच महिने मैदानापासून दूर आहे,' असेही ते म्हणाले.

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 177 धावांनी विजय मिळविला. त्यानंतर होबार्टमधील दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 80 धावांनी विजय मिळविला. या सलग पराभवांमुळे ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श यांनी राजीनामा दिला. तिसरा आणि अखेरचा सामना 24 नोव्हेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरू होईल. या सामन्यात कामगिरी उंचावून 'व्हाईट वॉश'ची नामुष्की टाळण्याचे खडतर आव्हान स्टीव्ह स्मिथ आणि त्याच्या संघासमोर आहे.

Web Title: South Africa Keep AB de Villiers as regular Skipper